साहित्यिक, समाजसेवक, चळवळीतील कार्यकर्त्यांचा सरकारला सल्ला : शेतकरी अपमान निषेध सभा लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : ज्या शेतकऱ्यांनी तुम्हाला मते दिली, सत्तेवर बसविले, त्यांना तुम्ही लाथा, शिव्या देत आहात. लक्षात घ्या, सत्तेचा माज चढू देऊ नका, नाहीतर पायउतार व्हायला वेळ लागणार नाही, असा सल्ला ज्येष्ठ साहित्यिक डॉ. यशवंत मनोहर यांनी दिला. दक्षिणायनतर्फे संविधान चौकात शेतकरी अपमान निषेध सभेचे आयोजन करण्यात आले होते. सभेचे अध्यक्ष म्हणून ते बोलत होते. भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी तूर खरेदीवरून शेतकऱ्यांना ‘साले’ असा शब्दप्रयोग केला. देशाच्या पोशिंदाच्या बाबतीत असा शब्दप्रयोग करणे म्हणजे त्याचा अपमान करणे होय. दानवेंनी केलेल्या शेतकऱ्यांच्या अपमानाचा यावेळी जाहीर निषेध करण्यात आला. यावेळी शेतकरी नेते विजय जावंधिया, माजी कुलगुरू हरिभाऊ केदार, सामाजिक कार्यकर्त्या लीलाताई चितळे, निवृत्त सनदी अधिकारी ई.झेड. खोब्रागडे, प्राचार्य बबनराव तायवाडे, अमिताभ पावडे, डॉ. प्रकाश तोवर, शरद निंबाळकर, रणजित मेश्राम, प्रा. प्रमोद मुनघाटे, नरेंद्र पलांदूरकर, हरीश धुरट, सुनिती देव, रमेश बोरकुटे, प्रभू राजगडकर, प्रभाकर कोन्डबत्तूनवार, बबन नाखले, डॉ. यशोदीप केदार, कौशिक वासनिक, सुजित जाधव, संजिवनी पावडे, सुभाष तुलसीता, स्नेहल वाघमारे, सुजित जाधव, मारोती वानखेडे, नितीन रोंघे, अरुण मोरघडे, संगीता महाजन, तन्हा नागपुरी, धरम पाटील, राजश्री पाटील आदी उपस्थित होते. याप्रसंगी शेतकऱ्यांच्या अपमान केल्याबद्दल शासनाचा निषेध करण्यात आला. यावेळी बोलताना विजय जावंधिया म्हणाले की, सरकारने तूर विकत घेतली म्हणून काही उपकार केले नाही. सत्तेचा माज आल्यासारखे वागू नका, सावध व्हा, असा इशारा दिला. एकूणच शेतकऱ्यांची अवस्था व शेतकऱ्यांच्या धोरणावर अमिताभ पावडे म्हणाले की, घरची करते देवा देवा, बाहेरचीला चोळी शिवा असे सरकारचे झाले आहे. लीलाताई चितळे म्हणाल्या की अन्नदाता आत्महत्या करतो आहे, अशावेळी त्यांची परिस्थिती सुधारायला हवी. पंतप्रधानांनी स्वत: लक्ष घालावे, परदेशी दौरे थांबावावे. शेतकऱ्यांचा अपमान होईल, असे वक्तव्य करू नका, हा प्रकार ‘विनाशकाले विपरीत बुद्धी’ आहे. शरद निंबाळकर म्हणाले की दानवेच्या रूपात सरकारचा हा उन्माद बोलतोय. बबनराव तायवाडे म्हणाले की शेतकऱ्यांबद्दल असे अपशब्द भाजपाच्या संस्कृतीला शोभत नाही. हरिभाऊ केदार यांनी या सभेला शोकसभा संबोधून, दानवेच्या मगरुरीचा निषेध केला. दानवेंचे उद्गार शेतकऱ्यांबरोबर कामगार व मजूरांच्या विरोधात आहे. तन्हा नागपुरी यांनी सत्ता की नशे में, भाजपा अपनी हालात भूल चूकी है... असा टोमणा हाणला. सभेचे संचालन अरुणा सबाने यांनी केले.
सत्तेची गुर्मी येऊ देऊ नको
By admin | Published: May 17, 2017 2:27 AM