गडकरींची दिलखुलास बॅटिंग : कार्यकर्त्यांसह नेत्यांचेही कान टोचले नागपूर : चांगले काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना महापालिकेच्या निवडणुकीत नक्की तिकीट मिळेल. नेत्यांच्या मागे फिरणाऱ्या व गळ्यात हार घालणाऱ्यांना नाही. आपल्या वॉर्डात काम करा. आमच्या मागे फिरण्यात वेळ वाया घालवू नका. जनतेने तुम्हाला पहिला चॉईस दिला तर कुणीही तुम्हाला मागे ठेवणार नाही, असे खडेबोल केंद्रीय परिवहन व जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी कार्यकर्त्यांना सुनावले. शहर भाजप कार्यकारिणीची बैठक क्रीडा चौकातील संत रविदास सभागृहात रविवारी झाली. शिबिराच्या समारोप प्रसंगी बोलताना गडकरी यांनी दिलखुलास बॅटिंग करीत कार्यकर्त्यांसह नेत्यांचेही कान टोचले. फडणवीस व माझा कोटा काही वाटल्या गेला नाही. त्यामुळे ४० जागा तू अन् ४० मी असे होणार नाही. प्रत्येकाला तिकीट देताना पडताळणी केली जाईल. काम करणाऱ्याला संधी मिळाली पाहिजे, ही माझी भूमिका आहे. मात्र, संधी मिळण्यासाठी तुम्ही पक्षात आले असाल तर संधी मिळणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. गडकरी म्हणाले, पक्ष वाढला तशा अपेक्षाही वाढल्या आहेत. प्रत्येकाच्या मनात ‘मला एक चान्स हवा’ हेच आहे. आता कार्यकर्त्यांचे समाधान शिबिर आयोजित कसे करायचे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. सत्ता नव्हती त्या काळात अनेक जण झटले. पक्ष वाढविला. त्यामुळे आज हे दिवस दिसत आहेत याची जाणीवही त्यांनी उपस्थितांना करून दिली. (प्रतिनिधी)सर्वांना लाल दिवे कुठून देणार ?गडकरी म्हणाले, अपेक्षा ठेवून काम करू नका. आम्ही सर्वांना लाल दिवे देऊ शकत नाही. एवढे लाल दिवे आणणार कुठून ? तुम्ही प्रसाद खाण्यासाठी भाजपमध्ये आलेले नाहीत. त्यामुळे पद मिळाले नाही तरी निराश होऊ नका. आपण भाजपमध्ये स्वत:साठी नाही तर समाजाचे प्रश्न सोडवून सामान्य माणसाचे समाधान करण्यासाठी आहोत, हे नीट समजून घ्या, असा सल्लाही गडकरी यांनी दिला. ज्यांना पदे दिली जातात तेच लोक पक्षात प्रश्न निर्माण करतात, असे सूचक वक्तव्य करीत पदप्राप्तीनंतरही कुरकुर करणाऱ्यांना गडकरींनी सावध केले.
काम करणाऱ्यांना तिकीट हार घालणाऱ्यांना नाही !
By admin | Published: June 22, 2015 2:47 AM