- लॉकडाऊनमुळे लहान मुले होत आहेत ‘मोटू’ : दंगा-मस्ती अन् उत्तम डाएटच तारतील आरोग्य
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोना संक्रमण आणि लॉकडाऊनमुळे गेल्या १५-१६ महिन्यांपासून मुले घरीच आहेत. शाळा बंद, ऑनलाइन शिक्षण आणि टीव्ही-मोबाइलमुळे मैदानी खेळांपासून मुले आपसूकच परावृत्त झाली आहेत. त्याचा परिणाम मुले तब्येतीत बरे दिसायला लागली आणि तब्येतीत बरी असलेली मुले लठ्ठ दिसायला लागली आहेत. त्यामुळे, मुलांमध्ये सुदृढता वाढते आहे, असा समज-गैरसमज पालकांमध्ये निर्माण झाला आहे. मुलांच्या मूळ प्रकृतीच्या उलट दिसत असलेले हे बदल म्हणजे सुदृढता नव्हे तर आजीवन आजारांची पायाभरणी होय, हे समजून घेणे गरजेचे झाले आहे.
------------
पॉईंटर्स
* संक्रमण आणि लॉकडाऊनमुळे मुले बसली घरी.
* शाळा बंद असल्याने मुलांची सामाजिक देवाणघेवाण बंद.
* शालेय मित्रांशी संवाद कमी झाल्याने टीव्हीच मित्र.
* ऑनलाइन शिक्षणामुळे मोबाइल हाच त्यांचा शिक्षक.
* त्यामुळे मुले आळशी व्हायला लागली.
-----------
पॉईंटर्स
* घराबाहेर जाण्यास परवानगी नसल्याने मुलांचा कोंडमारा.
* मैदानी खेळ बंद झाल्याने मुलांची शारीरिक कसरत बंद.
* आई-आजी काही ना काही व्यंजने बनवून मुलांच्या इच्छा पूर्ण करते.
* मात्र, ते पचविण्यासाठी कोणत्याच घडामोडी नाहीत.
* अशाने मुलांमध्ये अनपेक्षित लठ्ठपणा वाढतोय.
---------------------
ब्लडप्रेशर, मधुमेहाची भीती
मुलांच्या स्वाभाविक हालचाली बंद पडल्याने मुले आळशी होत आहेत. काही ना काही सतत खात असल्याने कॅलरींचे प्रमाण गरजेपेक्षा जास्त वाढत आहे. मात्र, कॅलरीज बर्न होत नसल्याने त्या शरीरात साठवल्या जात आहेत. त्याचा परिणाम अनावश्यक सुदृढता दिसायला लागली. त्यामुळे, पालक आनंदी आहेत. मात्र, ही सुदृढता आभासी आहे. अशीच स्थिती राहिली तर मुलांमध्ये ब्लडप्रेशर, मुधमेहाची भीती आहे. अशा अनेक केसेस या काळात मी बघितल्या. या वयात हे आजार मिळाले तर ते आयुष्यभर असतात. त्यामुळे मुलांच्या आहार-विहारासोबतच व्यायामाकडे लक्ष देणे गरजेचे आहे. टिनएजेसमध्ये हार्टअटॅकच्या केसेसही या काळात पुढे आल्या आहेत.
- डॉ. मिलिंद माने, बालरोग विशेषज्ञ
----------
खेळणे, घरकाम, ॲक्टिव्हिटीत गुंतवा
मुले स्थूल होणे, हे त्यांच्यातील डिप्रेशनची सुरुवात असते. अशा अनेक केसेस अनुभवात येत आहेत. घरातल्या घरात राहण्याने चिडचिड वाढली आहे. त्यामुळे मुलांना अंगणात, टेरेसवर किंवा घरातच दंगा-मस्ती करू देणे गरजेचे आहे. खेळता खेळता सूर्यनमस्कार, योग, व्यायाम सांगणे महत्त्वाचे ठरेल. शिवाय, कमी कॅलरी असणारे पदार्थ मुलांच्या आहारात या काळात ठेवणे महत्त्वाचे ठरेल. घरातल्या छोट्या बागकामात त्यांना गुंतवा, घरकामाचे महत्त्व समजावून सांगा आणि मुलांसाठीच्या प्रत्येक ॲक्टिव्हिटीमध्ये स्वत: सहभाग घेऊन मुलांना त्यात सहभागी करा, त्यांचे आकर्षण वाढवा. तरच मुले खऱ्या अर्थाने सुदृढ राहतील.
- डॉ. अनिल राऊत, बालरोग तज्ज्ञ
-------------
तज्ज्ञांचे सल्ले
* मुलांना टीव्हीवर स्पोर्ट्स चॅनेलमध्ये रस वाढवा.
* विविध ॲक्टिव्हिटीचे मार्गदर्शन करा.
* एक्झरसाइजचे महत्त्व समजावून सांगा आणि सोबत करा.
* चटपटीतऐवजी उपयुक्त खाण्याचे महत्त्व समजावून सांगा.
...........................