नागपूर : बळीराजा संकटात असताना सरकारने सरसकट कर्जमाफी दिली नाही, शेतमलाला किंमत दिली नाही, त्यामुळे जनतेचा विश्वास गमावलेल्या या सरकारविरुद्ध असहकार आंदोलन पुकारून, यापुढे सरकारची कुठलीही देणी देऊ नका, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले. दमदाटी करून, तुरुंगात टाकून आवाज दाबाल, तर तुम्हाला उखडून फेकण्याची ताकद बळीराजात आहे, असा इशाराही त्यांनी सरकारला दिला.काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शेकाप, आरपीआय (कवाडे गट), समाजवादी पक्ष, माकप यांनी मंगळवारी राज्य सरकारविरोधात हिवाळी अधिवेशनावर काढलेल्या जन आक्रोश व हल्लाबोल मोर्चाने उपराजधानी दणाणून गेली. खा. पवार यांनी भाजपावर हल्ला चढविला. संधी मिळेल, तेव्हा ते उलथून फेकायचे आहे. परिवर्तन होईपर्यंत हल्लाबोल थांबवायचा नाही, असे सांगण्यासही ते विसरले नाही.ज्येष्ठ काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, काँग्रेसचे प्रभारी मोहन प्रकाश, माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल, माजी खा. विजय दर्डा, खा. सुप्रिया सुळे आदी मोर्चाला उपस्थित होते.आरोप करताना लाज वाटायला हवी होतीपाकिस्तानच्या मदतीने गुजरातच्या निवडणुका जिंकण्याचा प्रयत्न काँग्रेस करत असून, दिल्लीत पाकिस्तानच्या प्रतिनिधींसोबत झालेल्या बैठकीला माजी पंतप्रधान मनमोहन सिंगही उपस्थित होते, या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आरोपाचा पवारांनी जोरदार समाचार घेतला.ते म्हणाले, मनमोहन यांच्यासारख्या देशभक्त आणि प्रामाणिक नेत्याचा पाकिस्तानशी संबंध जोडताना भाजपाला लाज वाटली पाहिजे. मोदी हे देशाचे पंतप्रधान आहेत. त्यांच्या मनात असले घाणेरडे विचार कसे येऊ शकतात? देशाच्या अंतर्गत गोष्टींमध्ये बाहेरील ताकदीला स्थान न देण्याची देशाची परंपरा मोडण्याचा प्रयत्न स्वत: पंतप्रधानांकडून होत आहे, याचे दु:ख वाटते, असेही पवार म्हणाले.
विश्वास गमावलेल्या सरकारची देणी देऊ नका, शरद पवार यांचे शेतक-यांना आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2017 6:00 AM