नागपूर : दिवाळीच्या कालावधीत फटाक्यांमुळे होणाऱ्या धुरामुळे उपराजधानीत मोठ्या प्रमाणावर वायुप्रदूषण होते. नागरिकांनी यंदाच्या दिवाळीत फटाके न फोडता ‘इकोफ्रेंडली’ दिवाळी साजरी करावी, असे आवाहन मंगळवारी सायकल रॅलीच्या माध्यमातून करण्यात आले. सहयोग ट्रस्ट आणि हॉक रायडर्स या संघटनांच्या पुढाकारातून या फटाकेविरोधी सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी ८ च्या सुमारास ही सायकल रॅली व्हेरायटी चौक येथून निघाली. यावेळी शेकडो नागरिक सहभागी झाले होते. ‘करो ना कोई बहाना पटाखे नही जलाना’, ‘नको प्रदूषण नको धूर, फटाके ठेवा दूर’ असे संदेश देणारे फलक अनेकांच्या हाती होते. सर्वोदय आश्रम, ट्रॅफिक पार्कच्या मार्गे ही रॅली दीक्षाभूमी येथे पोहोचली. या रॅलीत ५ वर्षाच्या अगस्त्य गौलकर या बालकाने सहभाग घेतला होता, सहयोग ट्रस्टचे विश्वस्त डॉ.रवींद्र भुसारी, हॉक रायडर्सचे अजय बन्सोडे, स्वप्नील श्रावणे, स्वराज फाऊंडेशनचे अध्यक्ष संदेश सिंगलकर, ह्युमन राईट्स अॅन्ड लॉ डिफेन्डर्सच्या समन्वयिका अॅड.स्मिता सरोदे सिंगलकर यांच्यासह निरनिराळ्या संघटनांचे पदाधिकारी या रॅलीत सहभागी झाले होते.मोठ्या आवाजांच्या फटाक्यांविषयी जनतेत जागरुकता निर्माण होत आहे. फटाकेविरोधी अभियानास नागरिकांनी जास्तीत जास्त प्रमाणात प्रतिसाद द्यावा. तसेच सुतिकागृहे, रुग्णालये किंवा भरवस्तीत फटाक्यांची आतषबाजी न करता मोकळ्या मैदानात कमी आवाजाचे फटाके फोडावे, असे आवाहन डॉ. भुसारी यांनी यावेळी केले.(प्रतिनिधी)
नको प्रदूषण नको धूर, फटाके ठेवा दूर
By admin | Published: October 22, 2014 1:08 AM