लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सामाजिक अंतर राखण्याची आज खरी गरज आहे. ही गरज ओळखून गर्दी टाळण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३० व्या जयंतीनिमित्त मिरवणुका काढू नका, घरीच बसून राष्ट्राचा प्राण असलेल्या संविधानाचे वाचन करा, असे आवाहन आंतरराष्ट्रीय धम्मगुरू तथा डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांनी आंबेडकरी अनुयायांना केले आहे. सध्या भारतासह जगभरातील २०० वर देशात कोरोनाचा संसर्ग झालेला आहे. या संसर्गावर नियंत्रण मिळविण्यासाठी सुरक्षित अंतर हाच एकमेव उपाय आहे. या पार्श्वभूमीवर देशात टाळेबंदी करण्यात आली आहे. अशातच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती येत्या १४ एप्रिल रोजी येत आहे. १३ एप्रिल रोजी रात्री शहरातील शेकडो बुद्धविहारातून मिरवणुका काढल्या जातात. शहराच्या चारही भागातील या मिरवणुका संविधान चौकात एकत्र येतात. हजारो अनुयायी रात्री १२ च्या ठोक्याला फटाक्यांची आतषबाजी व निळाईची उधळण करीत जयंतीचा जल्लोष करतात. १४ ला संविधान चौक व दीक्षाभूमी अनुयायांनी फुललेली असते. आंबेडकरी अनुयायांनी उपराजधानीतील रस्ते फुलून जातात. यंदा मात्र कोरोना संसर्गामुळे देशावर संकट आले आहे. या संकटाला मूठमाती देण्यासाठी आंबेडकरी अनुयायांना खबरदारी घ्यायची आहे. उत्सवानिमित्त जमावामुळे अखंड समाजाची प्रतिमा मलीन होऊ नये, याचीही खबरदारी घेण्याची गरज आहे. महामानवाच्या जयंतीला कुणीही मिरवणूक काढू नये, शहरातील सर्व बुद्धविहार कमिटीच्या पदाधिकाऱ्यांनी याची खबरदारी घ्यावी. वस्त्यावस्त्यांमध्ये समूहाने जयंती साजरी करू नका, घरीच डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेसमोर त्रिशरण व पंचशील ग्रहण करावे, असे कळकळीचे आवाहन धम्मगुरू ससाई यांनी केले आहे. विद्यार्थ्यांनी अभ्यास करावा तसेच बाबासाहेबांच्या विचारांची कास धरावी, त्यांनी दाखविलेल्या मार्गावर चालल्यास हीच खरी जयंती ठरेल, असेही ससाई म्हणाले.