नागपूर - ‘पैशामागे धावू नका, खेळावर फोकस करा, कामगिरी कराल तर पैसाच तुमच्यामागे धावेल. खेळावर ‘फोकस’केल्यास यश आणि ऐश्वर्य तुमचा पाठलाग करेल,’ असा मोलाचा सल्ला आंतरराष्टÑीय क्रिकेट परिषदेचे चेअरमन अॅड. शशांक मनोहर यांनी विदर्भातील क्रिकेटपटूंना दिला. प्रसंग होता रणजी करंडक विजेत्या विदर्भ संघाच्या सत्कार सोहळ्याचा.विदर्भ क्रिकेट संघटनेच्या सिव्हील लाईन्सस्थित स्टेडियमच्या हिरवळीवर रंगलेल्या या सोहळ्यात ऐतिहासिक विजयाचे शिल्पकार असलेल्या संघातील सर्व खेळाडू व सपोर्ट स्टाफला स्मृतिचिन्ह आणि तीन कोटींची रोख रक्कम मनोहर यांच्याहस्ते प्रदान करण्यात आली. यावेळी मार्गदर्शन करताना मनोहर यांनी आयपीएल तुमचे अंतिम ध्येय नाही, हे डोक्यात ठेवून कामगिरी उंचावण्याचे आवाहन केले. मला राष्ट्रीय संघात खेळायचे आहे असे स्वप्न उराशी बाळगल्यास यश आणि ऐश्वर्याचे धनी व्हाल, असा सल्ला दिला. मनोहर पुढे म्हणाले, ‘कोच हा तुमच्या चुका सुधारतो. कोचच्या गोष्टी ऐका व त्यावर विचार करा. तुमचा ज्युनियर खेळाडूही कधीकधी मोलाचा सल्ला देऊ शकतो.’मुंबईकर सहसा कुणाला खपवून घेत नाहीत, असे नमूद करीत मनोहर म्हणाले, ‘मुंबईचे दोन खेळाडू होते म्हणून विदर्भ विजेता ठरला, अशी प्रतिक्रिया मला ऐकायला मिळाली. मुंबई संघात मुंबईचेच खेळाडू होते व कोचही त्यांचे होते, मग मुंबई का जिंकली नाही. आमच्या खेळाडूंचे यश तुम्हाला मान्य नसेल पण कामगिरीच्या बळावर विदर्भ जिंकला, हे सत्य नाकारता येणार नाही. मी टीव्हीवर कधीही आंतरराष्टÑीय सामना पाहात नाही, पण विदर्भाचा अंतिम सामना पूर्ण पाहिला. मी बीसीसीआयचा अध्यक्ष राहिलो. आयसीसी चेअरमन आहे पण विदर्भ माझे पहिले प्रेम आहे. गतवर्षी विदर्भ १६ वर्षे गटाचा संघ विजेता ठरला होता.’
पैशामागे धावू नका, खेळावर फोकस करा - शशांक मनोहर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 06, 2018 1:46 AM