विवेक रानडे : जवाहरलाल दर्डा आर्ट गॅलरीत निरंजन गोहणेंच्या चित्रप्रदर्शनाचे उद्घाटननागपूर : कला हे अभिव्यक्तीचे माध्यम आहे. त्यामुळे कुठल्याही कलेतून अभिव्यक्त होण्याला व त्यातून मिळणाऱ्या आनंदाला आधी प्राधान्य दिले पाहिजे. माझ्या या निर्मितीला बाजारात किती किंमत मिळेल, हा विचार अजिबात मनात यायला नको, असे मत प्रसिद्ध छायाचित्रकार विवेक रानडे यांनी व्यक्त केले. निरंजन गोहणे यांच्या चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन जवाहरलाल दर्डा आर्ट गॅलरी येथे आज रविवारी सायंकाळी पार पडले. यावेळी ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. यावेळी मंचावर ललित कला विभागाच्या प्रमुख डॉ. मुक्तादेवी मोहिते, शासकीय चित्रकला महाविद्यालयाचे अधिष्ठाता प्रा. राजा मानकर, आर्किटेक्ट राजेश्वर निस्ताने व चित्रकार निरंजन गोहणे उपस्थित होते. एनिग्मा-शेडस् आॅफ हर या संकल्पनेच्या आधारे स्त्रीमनाच्या विविध पैलूंचे दर्शन घडविणारे हे चित्रप्रदर्शन प्रेक्षकांसाठी १६ ते २३ आॅक्टोबरपर्यंत सकाळी ११ ते ५ या वेळेत खुले राहणार आहे. याप्रसंगी आर्किटेक्ट राजेश्वर निस्ताने यांनी आपले विचार मांडले. ते म्हणाले, कलाकाराला जे दिसते ते इतरांना दिसत नाही. यासाठी कलाकाराचीच दृष्टी असायला हवी. तशी दृष्टी निरंजनकडे आहे म्हणूनच त्याचे चित्र वेगळे भासते. डॉ. मुक्तादेवी मोहिते यांनी या चित्रांना स्त्री भावनांचा उत्कट आविष्कार संबोधले. स्त्री म्हणजे व्यथा-वेदनांचे प्रतिरूप असे समजले जाते. पण, निरंजनने आपल्या या चित्रांमधून स्त्रीचे आनंदी व आत्मविश्वासपूर्ण चित्रण केले आहे. या चित्रांमधील स्त्री तरुण आहे, सुंदर आहे. तिचे मोहक रूप प्रेक्षकांचे मन मोहून घेते. प्रा. राजा मानकर यांनीही यावेळी आपले विचार व्यक्त केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक निरंजन गोहणे यांनी तर संचालन सदानंद चौधरी यांनी केले. (प्रतिनिधी)
चित्र काढताना किंमत नको, आनंद बघा!
By admin | Published: October 17, 2016 3:02 AM