लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोना संसर्गाचा व मृत्यूचा वेग कमालीचा वाढत चालला आहे. ९ ते १५ ऑगस्ट या सात दिवसांत ५०७२ रुग्णांची नोंद व १६६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये उपचारात उशीर झालेल्यांची संख्या मोठी आहे. यामुळे सुरुवातीच्या लक्षणांकडे दुर्लक्ष न करण्याचे आवाहन वैद्यकीय तज्ज्ञांनी केले आहे. त्यांच्यानुसार, बहुतांश रुग्ण प्रकृती जास्त बिघडल्यावर रुग्णालयात येतात. तोपर्यंत रुग्णांना श्वास घेण्यास त्रास सुरू होतो आणि तेथूनच ऑर्गन फेल्युअरची साखळी सुरू होते. हीच साखळी पुढे मृत्यूसाठी कारणीभूत ठरत आहे.
कोरोनाविषयी अनेकांमध्ये भीतीचे वातावरण असले, तरी बहुतांश लोक त्याच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करतात. सर्दी, खोकला आणि ताप असला तरी त्याकडे दुर्लक्ष केले जाते. मात्र, जेव्हा श्वास घेण्यास त्रास सुरू होतो, तेव्हा रुग्ण डॉक्टरकडे जातो. तोपर्यंत कोरोनाचा हल्ला फुफ्फुसांवर झालेला असतो. रुग्णाचा अहवाल येईपर्यंत त्याच्या फुफ्फुसाचे लोब खराब झालेले असतात. फुफ्फुस निकामी झाल्यानंतर यकृत, मूत्रपिंड यासारखे महत्त्वाचे अवयव निकामी होण्यास सुरुवात होत असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे ताप, सर्दी, खोकला जाणवताच रुग्णांनी थेट वैद्यकीय सल्ला घेऊन कोरोनाची तपासणी करावी, असे आवाहन डॉक्टरांनी केले आहे.
८० ते ८५ टक्के रुग्ण घेतात उशिरा उपचाररुग्णालयात दाखल होणारे ८० ते ८५ टक्के रुग्ण हे माईल्ड ताप, सर्दी, खोकला येऊन गेल्यावर जेव्हा श्वास घ्यायला त्रास होतो, तेव्हा रुग्णालयात दाखल होत असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. त्यांच्यानुसार, तोपर्यंत कोरोनाची लागण होऊन जवळपास सात ते आठ दिवसांचा कालावधी लोटलेला असतो. आजार गंभीर झालेला असतो.
- तर वाचू शकतात प्राणरोगप्रतिकारक शक्ती उत्तम असली, तर कोरोनापासून बचाव होऊ शकतो. पण, कोरोनामुळे अवयव निकामी होण्यास सुरुवात होण्यापूर्वीच उपचारास सुरुवात केल्यास प्राण वाचू शकतात. यामुळे रुग्णाला लक्षणे दिसताच वैद्यकीय तपासणी करण्याचा सल्ला डॉक्टर देतात.लक्षणे दिसताच डॉक्टरांचा सल्ला घ्याकोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने पसरत असताना दिसून येत आहे. दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत आहे. अशा दरम्यान सौम्य ताप जरी असल्यास किंवा सर्दी, खोकल्याची लक्षणे असल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे. जितक्या लवकर कोविडचे निदान होऊन उपचाराला सुरुवात होईल, तितक्या लवकर जीवाचा धोका कमी होऊ शकतो. विशेषत: मधुमेह, उच्च रक्तदाब, अस्थमा व हृदयविकाराचे आजार असलेल्या रुग्णांनी, ज्येष्ठ नागरिकांनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.-डॉ. पी.पी. जोशी, प्रमुख, औषधवैद्यकशास्त्र विभाग, एम्स