योगेश पांडे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : हिंदू हक्कांसाठी आमचा लढा सुरूच राहणार असल्याची भूमिका स्पष्ट करत असताना विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष विष्णू कोकजे यांनी लग्नसंस्थेच्या वर्तमान बदलांवर जोरदार टीका केली आहे. संस्कारविहीन शिक्षणामुळे पाश्चिमात्य विकृती देशात फोफावत आहेत. यातूनच लग्न करूनदेखील वर्षानुवर्षे अपत्य होऊ न देण्याचा ‘ट्रेन्ड’ आला आहे. जर मुलांना जन्मच द्यायचा नाही तर मग अशी लग्न काय कामाची असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. आंतरराष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर पहिल्यांदाच नागपुरात आले असताना त्यांनी ‘लोकमत’शी संवाद साधला.संस्कारविहीन शिक्षणामुळे कुटुंबपद्धतीत बदल होत असून संस्कारांचा अभाव जाणवायला लागला आहे. समलैंगिक विवाह, लग्नापूर्वी लैंगिक संबंध आणि ‘लिव्ह इन रिलेशनशीप’सारख्या पाश्चिमात्य विकृती यातूनच आपल्या देशात फोफावत आहेत. लग्नप्रणाली ही खरे तर एका विचारातून उदयाला आली. संततीला सामाजिक ओळख मिळावी व संस्कारांचे बीजारोपण व्हावे, हा त्यामागचा उद्देश होता. मात्र पाश्चात्त्य देशांप्रमाणे आपल्याकडेदेखील आता लग्न झाल्यानंतर मुले होऊ न देणे किंवा लग्नाशिवायच एकत्र राहणे असले प्रकार सुरू झाले. यावर समाजात मंथन होणे आवश्यक आहे, असे कोकजे यांनी प्रतिपादन केले.
बलात्कारी मुलांचे समर्थन का?यावेळी विष्णू कोकजे यांनी देशात वाढत असलेल्या बलात्कारांच्या घटनांवर चिंता व्यक्त केली. बलात्कार कोणावरही होवो तो निंदनीयच प्रकार आहे. मात्र हे प्रकार वाढले याला कुटुंबव्यवस्थेतील संस्कारांचा अभाव कारणीभूत आहे. घरात संस्कार मिळत नसल्यामुळे लहान वयातच अशा गोष्टींकडे मुले आकर्षित होतात. आश्चर्याची बाब म्हणजे जो मुलगा बलात्कार करतो, त्याला घरचे घराबाहेर न काढता त्याला वाचविण्यासाठी धावपळ करतात. अशा बलात्कारी मुलांचे समर्थनच कशाला हवे, असा प्रश्न कोकजे यांनी उपस्थित केला.
‘विहिंप’ आक्रमकता सोडणार नाहीस्वातंत्र्यानंतर आपल्या देशात सातत्याने हिंदू विचारधारेचे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न झाला. मात्र जेथे जेथे हिंदूंवर अन्याय होईल तेथे ‘विहिंप’ व बजरंग दलाचे कार्यकर्ते खंबीरपणे उभे ठाकतील. ‘विहिंंप’ आपली आक्रमकता सोडणार नाही. ‘विहिंप’च्या स्थापनेचा उद्देश सामाजिक समरसता होता. मात्र वेळेनुरुप ‘विहिंप’ला ध्येयधोरणांमध्ये बदल करावा लागला. परंतु अयोध्येत राममंदिर उभारल्यानंतर ‘विहिंप’ परत मूळ कामांकडे वळणार असल्याचे कोकजे यांनी सांगितले.
नवीन पिढीपर्यंत योग्य इतिहास जावास्वातंत्र्यानंतर काँग्रेस व डाव्या विचारधारेने हिंदूंचे नियोजनबद्ध पद्धतीने खच्चीकरण केले. विशेषत: अभ्यासप्रणालीत नको ते बदल केले. मात्र हाच बदल देशासाठी दुर्दैवी ठरला. अभ्यासक्रमांत विद्या आहे, मात्र संस्कार नाही. त्यामुळे शालेय अभ्यासक्रमात संस्कारयुक्त शिक्षणाची आवश्यकता आहे. योग्य इतिहास नवीन पिढ्यांपर्यंत गेला पाहिजे व त्यादृष्टीने बदल झाले पाहिजे, असे विष्णू कोकजे यांनी मत मांडले.
‘विहिंप’ला कुठलाही धोका नाहीडॉ.प्रवीण तोगडिया यांच्यावर यावेळी थेट भाष्य करण्याचे विष्णू कोकजे यांनी टाळले. सध्या ‘विहिंप’चे काही कार्यकर्ते नाराज आहेत. मात्र ही नाराजी जास्त दिवस टिकणार नाही. इतकी वर्षे ‘विहिंप’चे काम करत आहेत, ते परत येतील. ‘विहिंप’ला कुठलाही धोका नाही व समाजाच्या हितासाठी आणखी जोमाने कार्य करु, असे विष्णू कोकजे यांनी सांगितले.