अनुयायांना आवाहन : डॉ. आंबेडकर स्टुडंट्स फेडरेशनचा पुढाकार नागपूर : शिक्षणाशिवाय समाजाची प्रगती अशक्य आहे ही बाब ओळखून डॉ. बाबासाहेबांनी त्यांच्या संपूर्ण आयुष्यात शिक्षणाला सर्वाधिक महत्त्व दिले आहे. शैक्षणिक उपक्रम राबवूनच बाबासाहेबांना खरी आदरांजली देता येईल. यासाठी येत्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाला दीक्षाभूमीवर येताना पुष्पहार, फूल आणण्यापेक्षा अनुयायांनी एक वही व पेन घेऊन यावे असे आवाहन डॉ. बाबासाहेब आंबेडकर नॅशनल स्टुडंट फेडरेशनने केले आहे.डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १९५६ ला आपल्या लाखो अनुयायांना विज्ञाननिष्ठ बुद्धाच्या धम्माची दीक्षा दिली होती आणि एका नवीन संस्कृती व नवीन युगाची सुरुवात करून दिली. या ऐतिहासिक क्रांतीची आठवण म्हणून दरवर्षी लाखो अनुयायी प्रेरणादायी दीक्षाभूमीला भेट देण्यासाठी विजयादशमीला नागपूरला येतात. हा जनसागर पुष्प व पुष्पहार अर्पण करून बाबासाहेब व बुद्धाला अभिवादन करतो. या समाजाने पुस्तकांचे महत्त्व जाणले आहे. त्यामुळे येथे येणारे लोक एक तरी पुस्तक घेऊन घरी जातात. जाताना पुस्तक घेऊन जातो त्याच पद्धतीने येतानाही शिक्षणाला मदत होईल असे साहित्य आणणे अधिक महत्त्वपूर्ण ठरेल. त्यामुळे यावर्षी दीक्षाभूमीवर येताना सोबत एक वही आणि एक पेन आणावा व तो दान करावा असे आवाहन फेडरेशनचे सिद्धांत यांनी केले आहे. आपल्या देशात आजही गरिबीमुळे अनेक विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहतात. आंबेडकरी अनुयायांनी पेन आणि वही दान केली तर अशा गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची मदत करून सहकार्य करता येईल. या एका वही आणि पेनाच्या माध्यमातून बाबासाहेबांचे विचार पुढे नेण्याचा हा छोटासा प्रयत्न असल्याचे सिद्धांत यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
पुष्पहार नको, आणा पेन आणि वही
By admin | Published: October 03, 2016 2:59 AM