नागपूर: स्वतंत्र राज्य मिळावे म्हणून आतापर्यंत आम्ही निवेदने, अर्ज, आंदोलने केली. मात्र, सत्ताधारी ही मागणी पूर्ण करीत नसल्यामुळे आता आम्ही 'करू किंवा मरू' आंदोलन करणार असल्याची घोषणा विदर्भ राज्य आंदोलन समितीचे अध्यक्ष अॅड वामनराव चटप यांनी केली. या संबंधाने २७ डिसेंबरपासून संविधान चाैकात आमरण उपोषण केले जाणार असल्याचेही त्यांनी आज पत्रकारांना सांगितले.
७ डिसेंबरपासून नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरू झाले. मात्र, त्यात विदर्भातील जनतेच्या ज्वलंत प्रश्नांवर चर्चाच होत नाही. वीज, पाणी, कोळसा अशी मुबलक नैसर्गिक साधनं असताना देखिल विदर्भाचा मागासलेपणा संपायला तयार नाही. नापिकी, आर्थिक कोंडीमुळे शेतकऱ्यांना आत्महत्या कराव्या लागतात आहे. दरवर्षी मोठ्या प्रमाणात गर्भवती महिला-माता आणि बालके कुपोषणामुळे मरत आहेत. रोजगार नसल्याने बेरोजगारांची फाैज निर्माण झाली आहे.
सरकारच्या धोरणामुळे विदर्भ आता ओसाड गावांचा अशांत प्रदेश बनला आहे. विदर्भाला सुजलाम सुफलाम बनवायचे असेल तर स्वतंत्र राज्य निर्माण होणे गरजेचे आहे. त्यासाठी केंद्र सरकारने संसदेत विदर्भ राज्याची घोषणा करणे आवश्यक आहे. केंद्राने ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत स्वतंत्र विदर्भ राज्याची घोषणा करावी यासाठी आम्ही नागपूरच्या संविधान चाैकात २७ डिसेंबरपासून आमरण उपोषण करणार असल्याचे त्यांनी सांगतिले. यावेळी समितीचे डॉ. श्रीनिवास खांदेवाले, प्रा. प्रभाकर कोंडबत्तूनवार, अरुण केदार, तात्यासाहेब मते, नरेश निमजे, अॅड. अविनाश काळे, अॅड.मृणाल मोरे, नाैशाद हुसेन आदी उपस्थित होते.
आज बोंबाबोंब आंदोलन
नागपुरात होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात विदर्भातील ज्वलंत समस्यांवर चर्चा होत नसल्याने पत्रकार प्रकाश पोहरे यांनी निषेध म्हणून विधानसभा परिसरात आवाज उचलला. सत्ताधाऱ्यांनी त्यांची दखल घेतली नाही मात्र विरोधकांपैकी कुणीही त्या संबंधाने आवाज उचलला नाही. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधक या दोघांचाही आम्ही निषेध करीत आहो. त्यासाठी बुधवारी सायंकाळी बोंबाबोंब आंदोलन केले जाणार असल्याचे अॅड. अविनाश काळे यांनी यावेळी सांगितले.