लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मेडिकलमध्ये कोट्यवधीचे प्रकल्प पूर्णत्वाच्या मार्गावर आहेत. ते तडीस नेण्यासाठी प्रत्येकाच्या प्रयत्नांची गरज आहे. मोठ्या कष्टाने मेडिकलच्या प्रगतीला गती आणली आहे, त्याला समोर घेऊन जा. विद्यार्थ्यांना व रुग्णांना केंद्रबिंदू मानून लोकभिमुख कार्य करा. भूतकाळात काय झाले यात वेळ न घालविता, भविष्यात कोणकोणत्या योजना पूर्णत्वास आणता येईल त्यासाठी प्रयत्न करा, असे आवाहन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) अधिष्ठातापदावरून सेवानिवृत्त झालेले डॉ. अभिमन्यू निसवाडे यांनी केले.डॉ. निसवाडे यांनी अस्थिव्यंगोपचारशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. सजल मित्रा यांच्याकडे अधिष्ठातापदाचा कार्यभार सोपविला. यावेळी महाविद्यालयाच्या सर्वच विभागाचे प्रमुख, वैद्यकीय शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.आशिया खंडातील सर्वात मोठे रुग्णालय म्हणून ओळख असलेल्या मेडिकलच्या अव्यवस्था व दुरवस्थेबाबतच नेहमीच चर्चा व्हायची. यासाठी अपुरे संसाधनाचे कारण पुढे केले जायचे. परंतु याच संसाधनाला हाताशी घेऊन डॉ. निसवाडे यांनी विकासात्मक बदल घडवून आणले. सर्वप्रथम त्यांनी रुग्णालयातील स्वच्छतेला प्राधान्य दिले. बाह्यरु ग्ण विभागाच्या (ओपीडी) रुग्ण तपासणीची वेळ एक तासाने वाढविली. जखमी व गंभीर आजाराच्या रुग्णांना तात्काळ उपचार मिळावा यासाठी औषधवैद्यकशास्त्र विभागाची व शल्यचिकित्सा विभागाची दोन स्वतंत्र आकस्मिक विभाग तयार केले.‘ट्रॉमा केअर सेंटर’ पूर्ण क्षमतेने रुग्णसेवेत आणले. ‘मूत्रपिंड प्रत्यारोपण’ सुरू करून कमी अवधितच ५० रुग्णांना नवे जीवन दिले. मेंदू मृत झालेल्या व्यक्तीचे अवयव काढून (रिट्रायव्हल) त्याचे प्रत्यारोपण करण्याची प्रक्रियाही सुरू केली. ‘पेडियाट्रिक सर्जरी’चा स्वतंत्र विभाग सुरू केला.तीन अतिदक्षता विभागाचे निर्माण कार्य त्यांच्याच मार्गदर्शनास पूर्णत्वास आले. कॅन्सर हॉस्पिटल, स्टेट स्पायनल इन्ज्युरी सेंटर, लंग इन्स्टिट्यूट, रिजनल जेरियाट्रिक सेंटर, ८० खाटांचे स्वतंत्र ‘निओनेटोलॉजी विभाग’ (एनआयसीयू) व ‘एक्सलन्स सिकलसेल सेंटर’ व रोबोटिक सर्जरीला मंजुरी मिळण्यासाठी विशेष परिश्रम घेतले. यामुळेच या वर्षात यातील काही प्रकल्प रुग्णसेवेत सुरू होतील. विद्यार्थ्यांना अद्ययावत सोयी उपलब्ध करून दिल्यात. यात ‘ई-लायब्ररी’चे नुतनीकरण, डिजिटल्स लेक्चर्स हॉल, वसतिगृहाचे नुतनीकरण व अभ्यास कक्ष स्थापन केले. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, ‘ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस’साठी (एम्स) डॉ. निसवाडे यांनी यात पुढाकार घेत मेडिकल महाविद्यालयाची एक विंग ‘एम्स’ला दिली. यामुळे या वर्षी ‘एम्स’चे एमबीबीएसचे वर्ग मेडिकलमधून सुरू झाल्याचे मनोगत यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांनी व्यक्त केले.