मुख्यमंत्र्यांचा कार्यकर्त्यांना सल्ला : मनपात दीडपट जागा जिंकायच्या भाजपच्या शहर कार्यकारिणीची बैठक रविवारी क्रीडा चौकातील संत रविदास सभागृहात आयोजित करण्यात आली. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन झाले. या वेळी केंद्रीय परिवहन व जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खा. संजय धोत्रे, माजी खा. बनवारीलाल पुरोहित, महापौर प्रवीण दटके, शहर अध्यक्ष आ. कृष्णा खोपडे, आ. सुधाकर देशमुख, आ. अनिल सोले, आ. सुधाकर कोहळे, आ. डॉ. मिलिंद माने, आ. विकास कुंभारे, मायाताई इवनाते, माजी आ. अशोक मानकर, स्थायी समितीचे अध्यक्ष रमेश सिंगारे आदी उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, १९९५ मध्ये राज्यात युतीचे सरकार आले तेव्हा आपण जवळून पाहिले आहे, सत्ता येताच अनेक लोक एका रात्रीत भाजपचे होतात, जे कधीच आपले नसतात. त्यामुळे येत्या काळात आपले लोक लक्षात ठेवा व आपले काम लक्षात ठेवा, असा सल्ला त्यांनी दिला. निवडणुका कार्यकर्त्यांच्या नेटवर्कच्या बळावर जिंकल्या आहेत. आता कार्यकर्ते शांत झाल्यासारखे वाटतात. मंडळ, महामंडळाचा उल्लेख केला तरच टाळ्या वाजतात, असे चिमटे काढत जुलैमध्ये याद्या तयार होऊन आॅगस्टमध्ये त्यावर शिक्कामोर्तब होईल. सर्वांना संधी मिळेल, असे त्यांनी आश्वस्त केले. पण हेच पद, मंडळ हवे, असा आग्रह धरू नका. तसे करणे शक्य नाही. आपल्याला सत्ता सामान्यांचा सेतू बनण्यासाठी हवी आहे, याची जाणीवही त्यांनी कार्यकर्त्यांना करून दिली. जनतेच्या अपेक्षा वाढल्या आहेत. राज्य सरकारने सहा महिन्यात ४४ आश्वासने पूर्ण केली आहेत. आपले माध्यम मीडिया नाही तर कार्यकर्ता आहे. दीड वर्षांनी महापालिकेच्या निवडणुका आहेत. त्यामुळे विकासाचा अजेंडा लोकांपर्यंत घेऊन जा, लोकांचा विश्वास जिंका, असे आवाहन करीत आपल्याला महापालिकेत आहे त्यापेक्षा दीडपट जास्त जागा जिंकायच्या आहेत, असा निर्धारही त्यांनी यावेळी व्यक्त केला. नागपूर : काही लोक विशिष्ट अधिकाऱ्यांची, व्यक्तिगत स्वरूपाची कामे घेऊन येतात. ही कामे झाली नाही तर नाराज होतात. अशी कामे स्वीकारताना तुम्हीच विचार करा. तुमच्याकडे येणारे काम सार्वजनिक हिताचे असेल तर ते त्वरित स्वीकारा. मला सांगा, मी मार्गी लावतो. अशा कामांसाठी नाराज होण्याचा अधिकार तुम्हाला आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘लाभा’च्या कामांसाठी चकरा मारणाऱ्या कार्यकर्त्यांना भानावर आणले.
सार्वजनिक हिताची कामे सांगा
By admin | Published: June 22, 2015 2:33 AM