लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : संशोधन पॅशन आहे. ते २४ बाय ७ असते. संशोधन एक दिवसाचे, एका आठवड्याचे किंवा एका वर्षाचे कधीच होऊ शकत नाही. त्यामुळे नव्या पिढीने पदवी शिक्षणापासून संशोधनाची कास धरावी. संशोधनाला बंदिस्त न ठेवता ते आकाशाला गवसणी घालणारे आणि अधिक समाजोपयोगी कसे होईल, याकडे लक्ष देण्याचे आवाहन मुंबई विद्यापीठाचे प्रा. पद्मविभूषण डॉ.एम.एम.शर्मा यांनी केले.स्व.दादासाहेब काळमेघ दंत महाविद्यालय आणि रुग्णालयाच्यावतीने दादासाहेब काळमेघ यांच्या ८५ जयंती वर्षानमित्त संशोधन दिनाचे आयोजन शुक्रवारी वानाडोंगरी येथे करण्यात आले होते. यावेळी डॉ. शर्मा यांनी पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला.नव्या पिढीतील संशोधनात्मक कृतीचे कौतुक करीत प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञान देण्यापेक्षा सध्या त्यांच्या क्षेत्रात जे नवीन घडते आहे त्याची माहिती विद्यार्थ्यांनी द्यावी. पुस्तकी शिक्षणाने संशोधनात्मक पिढी कधीही घडणार नाही. याउलट प्राध्यापक अपडेट नाही असा ग्रह विद्यार्थी करतील, अशी कोपरखळी त्यांनी उपस्थित प्राध्यापकांना मारली.संशोधनाच्या क्षेत्रात काळमेघ दंत महाविद्यालयाने टाकलेल्या पावलाचे कौतुक करीत या महाविद्यालयाने दंतचिकित्सा आणि संशोधन क्षेत्रात उत्कृ ष्ट कामगिरी बजवावी, असे आवाहनही यावेळी केले. दंतचिकित्सा क्षेत्रात सध्या आमूलाग्र बदल होत आहे. दातांची काळजी आता केवळ अप्पर क्लास घेत नाही तर सामान्य माणूसही आता याबाबत सजग झाला असल्याने या क्षेत्रात चांगल्या संशोधनाच्या माध्यमातून सामान्य नागरिकांना चांगल्या आणि माफक दरात दंत आरोग्य सेवा कशी मिळेल, याकडे महाविद्यालय आणि संशोधकांनी लक्ष देणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.आयसीटी मुंबईचे कुलगुरु पद्मश्री डॉ. जी.डी.यादव, स्व. दादासाहेब काळमेघ स्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. शरद काळमेघ, सचिव हेमंत काळमेघ, महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. संजय पाटील, उद्योजक अरुण लखानी, संजय चौगुले,डॉ. सतीश लाडे, शशांक म्हस्के, संजय देशमुख आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.संशोधनाच्या क्षेत्रात महाविद्यालयाने घेतलेल्या विविध उपक्रमांची माहिती डॉ. शरद काळमेघ यांनी याप्रसंगी दिली. यासोबतच संशोधनाच्या क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाºया विद्यार्थी आणि शिक्षकाला वर्षाला प्रत्येकी १ लाख १ रुपयांचा पुरस्कार देण्याचे त्यांनी याप्रसंगी जाहीर केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अधिष्ठाता डॉ. संजय पाटील यांनी केले.मुली शिकतील तरच लोकसंख्येवर नियंत्रणकेंद्र सरकारने मुलींना पहिली ते पीएच.डी पर्यंतचे शिक्षण मोफत देण्याची मागणी डॉ.जी.डी.यादव यांनी यावेळी केली. तत्कालीन मनुष्यबळ विकास मंत्री अर्जुनसिंग यांच्याकडे तसा प्रस्ताव ठेवला होता, असे सांगताना ते म्हणाले की, भारतात १० वी १२ बारावीपर्यंत मुलगी शिकली की तिचे वडील लग्न लावतात. मुलींना न शिकविण्यामागे आर्थिक परिस्थिती हेही कारण आपल्याकडे आहे. त्यामुळे सरकारने मुलींचे पीएच.डी.पर्यंतचे शिक्षण मोफत केले तर मुली अधिक उच्चशिक्षित होतील. उच्च शिक्षण घेताना त्यांचे वयही वाढले. पर्यायाने लग्न उशिरा होईल आणि शिक्षित माता लोकसंख्या नियंत्रणाचे प्रभावी माध्यम ठरेल, असे मत यादव यावेळी मांडले. दादासाहेब काळमेघ यांच्या सामाजिक विचाराप्रमाणेच त्यांच्या नावाने चालणाऱ्या महाविद्यालयातील संशोधन समाजोपयोगी कसे होईल, याकडे लक्ष देण्याचे आवाहन महाविद्यालयातील संशोधक आणि प्राध्यापकांना यावेळी केले.