नागपूर : रेल्वे गाड्यांमध्ये लागणाऱ्या आगी आणि प्रवाशांच्या जीविताला होणाऱ्या नुकसानीमुळे पोळून निघालेल्या रेल्वे प्रशासनाने या घटना टाळण्यासाठी रेल्वेच्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्याची मोहिम सुरू केली आहे. १६ नोव्हेंबरला ही मोहिम सुरू झाली असून ती २२ पर्यंत चालणार आहे.
अलिकडे रेल्वेत छोट्या मोठ्या आगी लागण्याचे प्रमाण वाढले आहे. भविष्यात या घटनांमध्ये वाढ होऊ नये आणि कुणालाही रेल्वेतील आगीची झळ बसू नये, यासाठी रेल्वे प्रशासनाने खास उपाययोजना करण्याचा निर्णय घेतला आहे. या उपाययोजना सोबतच आता रेल्वेचा प्रत्येक कर्मचारी अलर्ट राहावा म्हणून त्यांना आगीच्या घटना कशा टाळायच्या या संबंधाने प्रशिक्षण देणेही सुरू केले आहे. आठवडाभराच्या या प्रशिक्षण मोहिमेत रेल्वे प्रशासनाने रेल्वे स्थानकांवर काम करणारे ठिकठिकाणचे कुली, स्वच्छता कर्मचारी, पार्सल कर्मचारी, पॅन्ट्री कार कर्मचारी, खानपान कर्मचारी, ऑन-बोर्ड हाउसकीपिंग करणारे कर्मचारी आणि ट्रेन ऑपरेशनमध्ये सहभागी इतर बाहेरचे कर्मचारी यांचा समावेश केला आहे.
अग्निसुरक्षेच्या विविध उपाययोजनामध्ये रेल्वे डब्यांमध्ये कशामुळे आग लागू शकते ते सर्व कसे शोधायचे, अग्निशमन यंत्रणेची सातत्याने तपासणी करणे, ज्वलनशील वस्तू, पदार्थांची वाहतूक होऊ नये म्हणून पार्सल व्हॅनची तपासणी करणे आणि ज्वलनशील वस्तू शोधण्यासाठी गाड्यांमधील सर्व डस्टबिन तपासणे यांचा समावेश आहे. कर्मचाऱ्यांना या संबंधाने अत्यंत तत्परतेने उपाययोजना कशा करायच्या त्याबाबतही माहिती दिली जात आहे.
मोहिमेच्या पहिल्या दिवशी ७०७ प्रवासी, ३८ कुली, २८ कर्मचारी, ४० पार्सल कर्मचारी, ८२ पॅन्ट्री कार कर्मचारी, ६१ खानपान कर्मचारी, ४० कुली, ४५ ऑन- बोर्ड हाऊसिंग स्टाफ, ५७ बाहेरचे (आउटसोर्स) कर्मचारी यांना आगीची दुर्घटना टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक पावले उचलण्याचे प्रशिक्षण देण्यात आले.
११४ गाड्या, ५४ स्थानकांची तपासणीया मोहिमेअंतर्गत विविध मार्गावर धावणाऱ्या ११४ रेल्वे गाड्या, ५४ स्थानके आणि ३७ यार्ड / वॉशिंग लाइन / पिट लाइन / इंधन बिंदू तपासण्यात आले. या मोहिमेत ज्वलनशिल पदार्थ बाळगणाऱ्या दोन व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला.
प्रवाशांसाठी जागरूकता उपक्रमप्रवाशांमध्ये जागरूकता यावी म्हणून ठिकठिकाणच्या ४१ स्थानकांवर सार्वजनिक उद्घोषणा प्रणालीद्वारे जनजागरण करण्यात आले. ७ स्थानकांवर व्हिडिओ दाखवून धोक्यापासून अवगत करण्यात आले तर, ४० स्थानकांवर स्टिकर्स / पोस्टर लावून प्रवाशांना अलर्ट करण्यासाठी प्रवाशांना पत्रकेही वाटण्यात आली. गॅस सिलेंडर, पेट्रोल, डिझेल आणि रॉकेल, स्टोव्ह, माचिस, सिगारेट, लायटर तसेच फटाक्यांसह कोणतेही स्फोट करणारे पदार्थ सोबत बाळगू नये, असे आवाहनही रेल्वेकडून केले जात आहे.