लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अवघ्या काही मार्क्सनी ९० टक्के किंवा ९५ टक्के हुकले, आता संपलं सगळं... असं म्हणून निराशेच्या गर्तेत जाणारी हुशार मुलं आणि ती निराशा पेलता न आल्याने आत्महत्येचा मार्ग पत्करणारी मुलं बारावीच्या परीक्षेनंतर अधिक ठळकपणे दिसू लागतात. एक आकडेवारी असं सांगते की एखाद्या मुलाने कमी मार्क्स मिळाल्याने आत्महत्या केल्याचे एक प्रकरण जेव्हा उजेडात येते तेव्हा त्यामागे २० मुलांच्या मनात तसा विचार येऊन गेलेला असतो किंवा त्यांनी तसा प्रयत्न केलेला असतो. या पार्श्वभूमीवर आपल्याला कमी मार्क्स पडले, असे वाटणारे बारावी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी आणि त्यांचे पालक यांच्याविषयी नागपुरातील ज्येष्ठ मानसतज्ज्ञ व समुपदेशक डॉ. स्वाती धर्माधिकारी यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी प्रतिबंधात्मक टिप्स दिल्या.दहावी-बारावीचे निकाल हा विद्यार्थ्यांच्या जीवनमरणाचा प्रश्न का होतोय यावर गंभीरपणे पालक, शिक्षक, शिक्षणतज्ज्ञ, शासन व विद्यार्थी यांनी एकत्रित येऊन विचार करायला हवा आहे. दहावी-बारावीचे गुण आणि पुढील आयुष्य यांचा संबंध जो साधारपणपणे जोडला जातो तो एका बाजूने खरा मानला तरी तो अंतिम सत्य नसतो. इतिहासात हजारो उदाहरणे आहेत की नापास झालेल्या विद्यार्थ्यांनी पुढे एखाद्या दुसऱ्याच क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतली आहे. केवळ तीन तासांच्या लिखाणावर एखाद्या व्यक्तीची गुणवत्ता कशी काय मोजली जाऊ शकते? तशी त्याच्या कुटुंबीयांनी मोजावी काय? किंवा त्या विद्यार्थ्याने स्वत:ही मोजावी काय? कमी गुणांचा किंवा अपेक्षेनुसार गुण न मिळाल्याचा अथवा नापास झाल्याचा ताण येणे स्वाभाविक आहे. पण ताण हा आयुष्य संपवणारा का ठरतो? त्याला तसे का ठरू द्यायचे? सर्वांना एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते की, परीक्षेतील गुणांवरून आयुष्यात आपण यशस्वी ठरणार की नाही ते अजिबात ठरत नाही. संपूर्ण आयुष्यातला तो फक्त एक छोटासा कालावधी असतो की ज्यात तुम्हाला काही काळापुरती निराशा आलेली असते.
पालकांनी अशावेळी नेमकं काय करावं?पालकांनी आपल्या पाल्याच्या गुणांबाबत टोकाचे आग्रही असू नये. त्याच्या व्यक्तिमत्त्वाला अनुसरूनच त्यांनी त्याला अभ्यासक्रम निवडताना सूचना कराव्यात वा सल्ले द्यावेत. मुख्य म्हणजे स्वत:ला पूर्ण न करता आलेली शैक्षणिक आवड त्यांच्यावर लादण्याची चूक अजिबात करू नये. मुलांमधील मानसिक बदलही जागरूकपणे टिपायला हवेत. आपला मुलगा सतत नकारात्मक विचार करत असेल तर तात्काळ समुपदेशकांची मदत घ्यावी. निकालाबाबत खूप चर्चा चर्वण करू नये. त्याला अवास्तव महत्त्व देऊ नये. पाल्याची अन्य मुलांसोबत तुलना अजिबात करू नये.या निराशेपासून वाचायचे कसे?विद्यार्थ्यांना मला सांगावेसे वाटते, की ही परीक्षा अंतिम परीक्षा नव्हती असे स्वत:ला ठामपणे सांगा. ही फक्त बारावीची एक परीक्षा होती. पुढे आयुष्यात खूप वेगळी वळणे, वेगळ््या वाटा दडलेल्या आहेत आणि त्या सर्व चांगल्याच असणार आहेत हे स्वत:ला बजावणे आवश्यक असते. वर म्हटल्याप्रमाणे तुम्हाला ताण येऊ शकतो. मात्र हा ताण हाताळता येतो. कमी करता येतो आणि संपविताही येतो. त्यासाठी तुम्ही मदत घेऊ शकता. स्वप्नं पहाण्यात काहीच चूक नाही. मात्र त्याला पर्यायही ठेवले पाहिजेत. जसं प्लॅन ए फिस्कटला तर प्लॅन बी आणि प्लॅन सी तयार असावा. त्यासोबतच आपल्या क्षमता, मर्यादा यांचाही विचार आणि स्वीकार करायला शिकलं पाहिजे. स्वत:कडून केलेल्या अवास्तव अपेक्षाही प्रसंगी तुम्हाला निराशा देऊ शकतात.मन निराश होणे ही आपल्याला लागलेली फक्त एक वाईट सवय आहे. ती प्रयत्नपूर्वक बदलता येते. पालक किंवा अन्य कोणत्या समजदार व्यक्तीसोबत चर्चा करा. तुमच्या मनात येणारे सगळे विचार व्यक्त करा. भावनांना प्रगट करा. मन मोकळं झाल्यानंतर तुम्हाला तुमच्यातील गुणवत्ता दिसू लागेल, क्षमतांची जाणीव होईल आणि पुढचे योग्य मार्ग दिसू लागतील.स्वत:मधले हे कौशल्य, आवड, क्षमता आणि उपलब्ध संसाधने यांची सांगड घालून योग्य असा अभ्यासक्रम किंवा व्यवसाय तुम्ही निवडू शकता. तसं केलं नाही तर मग अपयश येण्याची शक्यता मोठी होते आणि आत्मविश्वास कमी होत जातो.