नागपूर : जिल्हा परिषदेच्या शाळा सुरु होऊन दहा दिवस झाले. जिल्ह्यात ८०९ शिक्षकांचे पदे रिक्त आहेत. ४२ शाळेत एकही शिक्षक नाही. जि. प. शाळांत सुरु असलेल्या शिक्षणाचा खेळखंडोबा थांबविण्याच्या मागणीसाठी जिल्ह्यातील विविध ग्रा.पं.च्या सरपंच आणि सदस्यांनी सोमवारी नागपुरातील उपमुख्यमंत्री कार्यालयावर धडक दिली. राष्ट्रीय पंचायती राज ग्राम प्रधान सरपंच संघटनेचे प्रदेशाध्यक्ष चंद्रपाल चौकसे यांच्या नेतृत्वात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मानद सचिव संदीप जोशी यांना निवेदन देत जि.प.शाळांच्या विदारक स्थितीबाबत लक्ष वेधण्यात आले.
जिल्ह्यात १५१५ शाळा असून त्यामध्ये ७२ हजारांवर विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. याकरिता शिक्षकांची ४५०० पदे मंजूर आहेत. त्यापैकी ८०९ पदे रिक्त आहेत. आहे त्या शिक्षकांवर एकापेक्षा जास्त वर्गांचा भार आहे. अशात विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण कसे मिळेल? सरकारच्या वतीने जि.प.शाळांतील विद्यार्थ्यांची संख्या कमी होऊ नये म्हणून विविध उपक्रम राबविले जातात. शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी कोट्यवधी रुपये आजवर खर्च केले केले. जि.प.शाळांची पटसंख्या वाढत असली तरी विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी शिक्षकच नसतील तर या सर्व बाबींचा उपयोग काय, असा सवाल सरपंच आणि सदस्यांनी यावेळी केला आहे. जोशी यांना निवेदन देणाऱ्या शिष्टमंंडळात रामटेक, पारशिवनी यांच्यासह विविध तालुक्यातील सरपंच आणि सदस्यांचा समावेश होता.
२०१३ पासून शिक्षकांची पदभरती झाली नाही. जिल्ह्यात ४० हून शाळेत एकही शिक्षण नाही. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना खासगी शाळांतील महागडे शिक्षण परवडणारे नाही. त्यामुळे शिक्षकच नसतील तर उद्याचे भविष्य घडेल कसे?
- चंद्रपाल चौकसे, प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रीय पंचायती, राज ग्राम प्रधान सरपंच संघटना