लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : एखाद्या व्यक्तीचा खून झाला की आत्महत्या झाली, हे त्याच्या शरीरावरील खुणा, अवयवावरील जखम, त्याच्या बदललेल्या रंगावरून होऊ शकते. याचे प्रत्यक्ष ज्ञान वैद्यकीय विद्यार्थ्यांसोबतच पोलीस व वकिलांनाही मिळण्यासाठी ‘एम्स’ने पुढाकार घेऊन ‘न्यायचिकित्सासंबधी संग्रहालय’ उभारले आहे. मध्य भारतातील हे पहिले संग्रहालय असल्याचे बोलले जात आहे.
या संग्रहालयाचे उद्घाटन गुरुवारी अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थानच्या (एम्स) संचालक मेजर जनरल (निवृत्त) डॉ. विभा दत्ता यांच्या हस्ते झाले. याची संकल्पना ‘एम्स’च्या न्यायवैद्यकशास्त्र विभागाचे विभागप्रमुख व रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. मनीष श्रीगिरीवार यांची आहे. नागपूर ‘एम्स’चे पूर्णत्वास आलेले हे पहिले संग्रहालय आहे. संग्रहालयात न्यायचिकित्सासंबंधी वैद्यकीय शिक्षणात मार्गदर्शक ठरणारे अद्ययावत असे विविध विभाग आहेत. हे संग्रहालय मध्य भारतातील वैद्यकीय विद्यार्थी, पोलीस, वकिलांच्या ज्ञानात निश्चितपणे भर टाकेल, असे मत डॉ. दत्ता यांनी यावेळी व्यक्त केले. याप्रसंगी डॉ. मृणाल फाटक यांच्यासह विविध विभागाचे वरिष्ठ डॉक्टर उपस्थित होते. संचालन डॉ. मंदार साने व डॉ. हर्षल ठुबे यांनी केले.
- जखमांवरून वापरलेल्या शस्त्राची होते माहिती
डॉ. श्रीगिरीवार म्हणाले, एखाद्या मृताच्या शरीरावरील जखमांवरून वापरलेल्या शस्त्राची माहिती मिळू शकते. असे जखम असलेले अवयव संग्रहालयात ठेवण्यात आले आहेत. यात हृदयापासून ते मेंदूपर्यंतचे सर्व मानवी अवयवही आहेत, सोबतच ८० वर शस्त्रे येथे ठेवण्यात आली आहेत. सोबतच विषाचा शरीरावर होणारा प्रभाव, विषाचे निदान कसे होऊ शकते, यासंदर्भाची माहिती देणारे अवयव, फलक व मॉडेलचाही संग्रहालयात समावेश आहे.