नागपूर : नागपुरातील टेकडी गणपती मंदिर हे प्राचीन आहे. तसेच, या ठिकाणी असलेल्या गणपतीची मूर्ती ही स्वयंभू आहे. दहा दिवस चालणाऱ्या गणेशोत्सवासाठी येथे आकर्षक रोषणाई केली. याशिवाय स्वयंभू मूर्तीच्या दर्शनासाठी भाविकांची मंगळवारपासून मोठ्या प्रमाणात गर्दी आहे.
पूर्वीच्या काळात भोसले राजघराण्यातील मंडळी नियमित येथे दर्शनाला येत होते. टेकडीच्या गणपतीचा ३५० वर्षे जुना इतिहास आहे. विदर्भातील अष्टविनायकांमध्ये पहिला मान टेकडी गणपतीला आहे.
नागपूरकरांचे आराध्य दैवत असलेले टेकडी गणपती मंदिर हे नागपूर रेल्वे स्टेशनपासून अगदी हाकेच्या अंतरावर आहे. सीताबर्डीच्या टेकडीवर हे गणपती मंदिर असल्याने त्याला टेकडी गणपती मंदिर असे म्हटले जाते. आपली मनोकामना पूर्ण करणारा, इच्छित फल देणारा, संकट निवारक असा हा बाप्पा असल्याची भाविकांची श्रद्धा आहे.
- काय आहे इतिहास ?
१८१८ साली नागपूरचे राजे अप्पासाहेब भोसले यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या मराठा-ब्रिटिश युद्धात अप्पा साहेबांचा पराभव झाला. त्यानंतर इंग्रजांनी सीताबर्डीच्या किल्ल्यावर ताबा मिळवला. याच टेकडीचा पूर्व भाग फोडून नागपूर रेल्वे स्टेशन निर्माण करण्यात आले. सुरुंग लावून हा भाग पडत असतानाच गणेशाची मूर्ती दृष्टीस पडली. याच कारणामुळे या मूर्तीला स्वयंभू गणेश मूर्ती असे म्हटले जाते. पिंपळाच्या झाडाखाली ही मूर्ती प्रकट झाली होती. आजही हा गणपती बाप्पा पिंपळाच्या झाडाखाली विराजमान आहे. काळाच्या ओघात मंदिरात अनेक स्थित्यंतरे आली. भाविकांच्या अपार श्रद्धेतून मंदिराचा जीर्णोद्धार झाला आणि सर्व सोयी सुविधांनी सुसज्ज असे मंदिर आज भाविकांसाठी निर्माण झाले आहे.
- दिग्गजांचं श्रद्धास्थान!
नागपूरकरांचं आराध्य दैवत असलेल्या या बाप्पाबद्दल अनेकांच्या मनात अपार श्रद्धा आहे. माजी पंतप्रधान नरसिंहरावपासून ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसपर्यंतच्या अनेक दिग्गजांचा यामध्ये समावेश आहे. अगदी अलीकडील पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील नागपुरातील आपल्या भाषणाची सुरुवात टेकडीच्या गणेशाला वंदन करून केली. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरही नागपुरात आल्यानंतर आवर्जून गणेशाचे दर्शन घेतो, अशी माहिती गणेश टेकडी मंदिराचे सचिव श्रीराम कुलकर्णी यांनी दिली.