२०१७-१८ मध्ये या पुरस्कारासाठी कामठी तालुक्यातील कढोली व मौदा तालुक्यातील चिरव्हा ग्रामपंचायतीने नोंदणी केली होती. पुरस्कारासाठी आवश्यक असलेल्या निकषानुसार ग्रामपंचायतीने उपाययोजना केल्या. केंद्रीय पथकाकडून ग्रामपंचायतीची तपासणी करण्यात आली. निकषात परिपूर्ण बसल्याने दोन्ही ग्रामपंचायतीची निवड पं. दीनदयाल उपाध्याय पंचायत सशक्तीकरण पुरस्कारासाठी करण्यात आली. अशा राज्यातील १७ ग्रामपंचायती पुरस्कारासाठी निवडण्यात आल्या. २३ ऑक्टोबर २०१९ रोजी हा पुरस्कार वितरण सोहळा नवी दिल्ली येथे केंद्रीय मंत्री नरेंद्रसिंग तोमर यांच्या उपस्थितीत पार पडला. सरपंचाला सन्मानपत्र व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. या पुरस्काराच्या रूपात सात लाख रुपये ग्रामपंचायतींना मिळणार होते. पुरस्काराची रक्कम विभागीय आयुक्तालयांतर्गत जिल्हा परिषदेला प्राप्त होते. जिल्हा परिषद ही रक्कम ग्रामपंचायतीच्या खात्यात जमा करते. अजूनही पुरस्काराची रक्कम ग्रामपंचायतीला मिळाली नाही.
- पुरस्कारासाठी जे निकष होते, ते निकष पूर्ण करण्यासाठी आम्ही भरपूर मेहनत घेतली. निवड झाली, मान मिळाला याचा आनंद आहे. पुरस्काराच्या रूपात जी रक्कम ग्रामपंचायतीला मिळणार होती, ती पुरस्कार वितरण सोहळ्याला वर्ष झाल्यानंतरही मिळाली नाही. पुरस्काराचे सात लाख रुपये मिळाले याची गावात चर्चा आहे. त्यावरून सरपंचावरच भ्रष्टाचार केल्याचा आरोप लावला जात आहे. एकाने तर पुरस्काराच्या रकमेचे काय झाले, याची माहितीच्या अधिकारात माहिती मागविली होती.
प्रांजल राजेश वाघ, सरपंच, ग्रामपंचायत कढोली
- आमचा पाठपुरावा सुरू आहे
या पुरस्काराची रक्कम जि.प.ला अप्राप्त आहे. ही रक्कम का मिळाली नाही, याबाबत काहीही सांगता येणार नाही. पुरस्काराची रक्कम तातडीने मिळावी यासंदर्भात वरिष्ठांकडे पाठपुरावा सुरू आहे, अशी माहिती जि.प.च्या पंचायत विभागाकडून मिळाली.