लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महापालिकेने शहरातील ६९ उद्याने बीओटी तत्त्वावर खाजगी संस्थांना देण्याचा निर्णय घेतला आहे. याद्वारे बागेमध्ये प्रवेश करण्यासाठी नागरिकांना दररोजचे शुल्क द्यावे लागणार आहे. या निर्णयाविरुद्ध शहरात हळूहळू असंतोष पसरत आहे. उच्चभ्रूंची वस्ती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रामदास पेठेतील नागरिकांनी या निर्णयाला विचित्र संबोधले असून, आता व्यायाम करण्यासाठी केवळ महानगरपालिकेचे कार्यालयच गाठायचे का, असा प्रतिप्रश्न उपस्थित करून प्रशासनाचे उट्टे काढले आहे. याबाबत रामदास पेठेतील दगडी पार्कमध्ये येणाऱ्यांची मते, ‘लोकमत’ने जाणून घेतली. तेव्हा बहुतांश नागरिकांनी या निर्णयाला विरोधच दर्शविला. तरुणांचे सोडा, पण लहान मुले आणि वृद्धांनी फिरण्यास जायचे कुठे, असा प्रश्न यावेळी उपस्थित केला गेला. त्यामुळे, या निर्णयाची अंमलबजावणी होऊ नये आणि हा निर्णय बाद व्हावा, अशी इच्छा सर्वांनी व्यक्त केली.
वातावरण खराब होईल
मनपाचा हा निर्णय आरोग्यप्रेमींच्या जिव्हारी लागणारा आहे. उद्यानात प्रवेश करण्यासाठी शुल्क सक्तीचे झाल्यास उपद्रवी तत्त्वांना रोखणे कठीण जाईल. अनावश्यक चाळे सुरू होतील आणि वातावरण खराब होईल.
- आर.एस. खालसा
उपद्रवींचा सुळसुळाट होईल
महापालिकेने आपल्या अखत्यारीत घेतल्यानंतर दगडी पार्कचा चेहरा बदलला. वातावरण चांगले झाले. पूर्वी येथे दारुडे, जुगारी व अश्लील कृत्य करणाऱ्यांचा सुळसुळाट होता. या निर्णयाने पुन्हा एकदा वातावरण दूषित होईल.
- सुनिका थेरगावकर
मोजके आणि चांगले लोक येतील
मनपाच्या या निर्णयाने अवाजवी लोक येण्यास मज्जाव होईल. शुल्क आकारल्यामुळे मोजकेच, पण चांगले लोक बागेत येतील. केवळ पाच रुपयांच्या वर शुल्क आकारायला नको. हा निर्णय चांगला आहे.
- अदिती बर्वे
नियोजनासाठी असेल तर स्वागत
उद्यानाचे व्यवस्थापन व नियोजन योग्य तऱ्हेने होत असेल, तर या निर्णयाचे स्वागतच आहे. यातून सामाजिक उपक्रमांसाठी निधी मिळत असेल तर हा निर्णय उत्तम आहे. विकास होणे महत्त्वाचे.
- पृथा शॉ
उद्यानात फिरण्यासाठीही कर द्यायचा का
पाणी, वीज काहीच फुकट मिळत नाही. केवळ एक उद्यानच उरले होते, त्यावर नागरिक आपला अधिकार सांगत होते. सर्वच गोष्टी पैशांत मोजता येत नाहीत. त्यामुळे, सशुल्क प्रवेशाचा हा निर्णय अवसानघातकी आहे.
- श्रीकांत चारी
काही दिवसांनी मतदानावरही टॅक्स लावा
काही नि:शुल्क देऊ नका. श्वास घेण्यावरही टॅक्स लावून टाका. कोरोनाकाळात केंद्र, राज्य आणि मनपाकडे पैसा नसल्याचे उजागर झाले. नागरिकांजवळ भरपूर पैसा आहे, अशीच त्यांची धारणा होती. काही दिवसांनंतर मतदानाच्या अधिकारावरही टॅक्स लावला जाईल, अशीच स्थिती या निर्णयावरून वाटते.
- आर.जे. राज
सकाळच्या वेळी शुल्क नको
या निर्णयान्वये दररोज पैो देणे कोणाही नागरिकाला शक्य होणार नाही. त्यामुळे, यात मासिक पासचा पर्याय ठेवावा. संध्याकाळी शुल्क ठेवावे. मात्र, सकाळच्या वेळी प्रवेशासाठी शुल्काचे बंधन नको.
- मधुर माहेश्वरी
आम्ही बिल्डिंगमध्ये कसे खेळायचे
आम्ही सगळे फ्लॅटमध्ये राहतो. तिथे खेळण्यासाठी जागा नाही. उद्यानातच आम्ही मोकळेपणाने वावरू शकतो. येथे प्रवेश शुल्क लागत असेल तर आमच्या खेळण्यावर बंधने येतील. दररोज पैसा लागेल तर आम्हाला इथे कोण येऊ देईल.
- खुशी गुप्ता
मोकळा श्वासही बाद म्हणू या का
हा निर्णय चुकीच आहे. अशाने तर मोकळा श्वासही घेऊ नका, असे मनपा म्हणेल. उद्याने ही पब्लिक प्रॉपर्टी आहे. त्यामुळे, किमान येथे तरी व्यावसायिकता नको.
मेंटेनन्सचे धिंडवडे निघतील
या निर्णयामुळे उद्यानाचे मेंटेनन्सबरोबर होणार नाही. प्रवेश शुल्कासोबतच नंतर मग मेंटेनन्स चार्ज मागितले जातील. खाजगीकरणामुळे उपद्रवी तत्त्वांचा राबता वाढेल, जे वातावरणासाठी चांगले नाही.
- राजेंद्र हुमाने
मनपाला खेळणारी मुले चांगली वाटत नाहीत का
मुले बिनधास्त खेळत आहेत, हसत-बागडत आहेत. हे वातावरण मनपाला नको आहे का. मेंटेनन्सबरोबर होणार नाही. शिवाय नको ते लोक, जोडपे येतील आणि वातावरण दूषित होईल. त्यामुळे, मनपाचा हा निर्णय अत्यंत चुकीचा आहे.
- आनंद व रोहिणी राय
...........