नागपूर : डॉक्टरांकडे लोक देवदूत म्हणून पाहतात व त्यांच्यावर पूर्ण विश्वास टाकतात. मात्र नागपुरातील एका डॉक्टरने वैद्यकीय क्षेत्राला काळिमा फासणारे काम केले आहे. शारीरिक अत्याचारातून जन्माला आलेल्या एका नवजात बालिकेची त्याने परस्पर विक्री केली. यासाठी त्याने बनावट डिलिव्हरी रेकॉर्ड तयार करत बोगस जन्मप्रमाणपत्रदेखील तयार केले. या प्रकरणात अजनी पोलिसांनी ‘आशिक’ असे नाव असलेल्या या डॉक्टरला अटक केली आहे. त्याने याअगोदरदेखील असा प्रकार केला आहे का, याचा तपास सुरू आहे. या घटनेमुळे मागील वर्षी गाजलेल्या नवजात बाळांच्या विक्री रॅकेटची चर्चा परत सुरू झाली आहे.
आशिक रशीद बराडे (४२, कोलते ले-आऊट, मानकापूर) असे आरोपी डॉक्टरचे नाव आहे. आशिष घनश्याम लद्धड (मानकापूर) याने एका तरुणीच्या आईवडिलांना धमकी देत तसेच तिच्यासह बहिणीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत शारीरिक अत्याचार केला. २०१७ ते २०२२ या कालावधीत त्याने तिला वडिलांच्या जिवाची भीती दाखवत अत्याचार केला. तसेच त्याने तिच्या कुटुंबीयांना व्यापाराच्या नावाखाली कर्ज घ्यायला लावले व ती रक्कम हडपली. तरुणी गर्भवती राहिली व २८ मार्च २०२२ रोजी डॉ. आशिक बराडे याच्या गोधनी येथील नर्सिंग होममध्ये तिने मुलीला जन्म दिला. मात्र मुलीची प्रकृती ठीक नसल्याचे कारण देत त्याने तरुणीला सुटी दिली. त्यानंतर डॉ. आशिकने बनावट आईच्या नावाने खोटे डिलिव्हरी रेकॉर्ड तयार केले. ती सर्व बनावट कागदपत्रे गोधनी येथील ग्रामविकास कार्यालयात वापरली व नवजात मुलीचे जन्मप्रमाणपत्र तयार केले. त्यानंतर त्याने त्या बाळाची विक्री केली. ही बाब पोलिसांच्या तपासात समोर आली. पोलिसांनी आशिकविरोधात गुन्हा नोंदवत त्याला अटक केली आहे.
अत्याचार करणाऱ्या आरोपीला बेड्या
दरम्यान, तरुणीने २८ मार्च २०२३ रोजी अत्याचाराबाबत आशिष लद्धडविरोधात अजनी पोलिस ठाण्यात तक्रार केली होती. तिला मुलीची कुठलीही माहिती देण्यात आली नव्हती. तिच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी लद्धडला अटक केली होती. त्याच्या चौकशीदरम्यान डॉ. आशिकचे प्रताप समोर आले.
मुलीची भंडाऱ्यात विक्री
डॉ. आशिक याने या मुलीची भंडारा जिल्ह्यातील एका निपुत्रिक दांपत्याला विक्री केली होती. त्याला अटक केल्यानंतर त्याला विचारणा केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र त्याला पोलिसी खाक्या दाखविल्यावर त्याने मुलीची विक्री केल्याचे कबूल केले. पोलिसांनी मुलीला नागपुरात आणले आहे. या प्रकरणात आणखी तपास सुरू आहे. डॉ. आशिक बराडे याने २००६ साली एमबीबीएस पूर्ण केले व तेव्हापासून तो प्रॅक्टिस करत आहे.