लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेयो) क्ष-किरण विभागातील एका व्हिडीओने शनिवारी खळबळ उडाली. अस्थिव्यंगोपचार विभागातील रुग्णाला एक कनिष्ठ डॉक्टर एक्स-रे काढताना चक्क मारहाण करीत असल्याचे समोर आले.प्राप्त माहितीनुसार, सतीश नावाच्या रुग्णाचा मांडीचे हाड तुटल्याने नातेवाईकांनी मेयोच्या अस्थिव्यंगोपचार विभागात दाखल केले. शस्त्रक्रियेसाठी वरिष्ठ डॉक्टरांनी आपल्या कनिष्ठ डॉक्टरला एक्स-रे करण्याचा सूचना दिल्या. रुग्णाचा एक्स-रे काढताना रुग्णाला असह्य वेदना होत होत्या. यामुळे योग्य पद्धतीचा एक्स-रे येत नव्हता. यामुळे कनिष्ठ डॉक्टराने रुग्णाचे दोन्ही पाय पकडले. त्याची ओढाताण केली. रुग्ण वारंवार पाय वर करीत असल्याने रागाच्याभरात डॉक्टरने त्याला मारहाण केली. रुग्णाच्या एका नातेवाईकाने आपल्या मोबाईलमध्ये या घटनेचे चित्रीकरण केले. वरिष्ठ डॉक्टरांचे रुग्णांकडे लक्ष नसल्याने असे प्रकार होत असल्याचे नातेवाईकांचे म्हणणे आहे. संबंधित डॉक्टराचे भविष्य धोक्यात येऊ नये म्हणून नातेवाईक तक्रार करण्यास तयार नाहीत, परंतु हा प्रकार थांबावा म्हणून व्हिडीओ व्हायरल केल्याचे त्यांनी सांगितले.मेयोच्याच एका डॉक्टराने नाव न लिहिण्याच्या अटीवर सांगितले, मेयोच्या अस्थिव्यंगापेचार विभागात रुग्णांचा भार वाढत आहे. अशात कोणी रुग्ण दारू पिऊन आल्यास आणि त्यांच्याकडून उपचाराला प्रतिसाद मिळत नसल्यास डॉक्टरांचा संताप अनावर होतो. या घटनेतही असेच काही झाले असावे, असा शंका त्यांनी व्यक्त केली.या प्रकरणाविषयी अस्थिव्यंगोपचार विभागाचे प्रमुख डॉ. कोईचाडे यांना विचारले असता त्यांनी हिवाळी सुट्यांवर असल्याचे सांगितले. परंतु प्रकरणाची चौकशी करणार असल्याचेही ते म्हणाले.
डॉक्टरकडून रुग्णाला मारहाण : मेयोतील प्रकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 09, 2019 11:39 PM