नरेश डोंगरे
लोकमत न्यूज नेटवर्क
“हर समझौते में समझदार ही क्यों झुकता है ।
कोई झांक के देखे एक बार की वो अंदर से कितना टूटता है ।।”
नागपूर : दरदिवशी अनोळखी रुग्णांच्या आणि त्यांच्या नातेवाइकांच्या वेदनांवर आपुलकीने फुंकर घालणाऱ्या डॉक्टरचे मन मात्र आप्तांनी दिलेल्या वेदनांनी पुरते रक्तबंबाळ होते. दुसऱ्यांच्या जखमांवर मायेची मलमपट्टी करणाऱ्या हसतमुख डॉक्टरची जखम मात्र तशीच भळभळत राहिली. ती दिवसागणिक चिघळतच गेली अन् ते सर्व असह्य झाल्याने त्यांनी स्वताच स्वत:ला ‘भूल’ देऊन या वेदनांमधून स्वत:ची कायमची सुटका करून घेतली.
सुखवस्तू कुटुंबातील, मोठ्या हुद्द्यावर अन् सदैव हसतमुख असणारा संवेदनशील व्यक्ती सुखीच असते, असे नाही. त्याच्या अंतर्मनातील वेदनांवर आप्तांनी वेळीच प्रेमाने फुंकर घातली नाही. त्याला झिडकारले, तर तो काय करू शकतो, याची करुणाजनक प्रचिती डॉ.अभिजीत रत्नाकर धामनकर या डॉक्टरांच्या आत्मघातातून आली आहे आणि म्हणूनच हे प्रकरण आता सर्वत्र चर्चेला आले आहे.
डॉ. अभिजीतचे संपूर्ण कुटुंब उच्चशिक्षित, लब्धप्रतिष्ठित. वडील डॉक्टर, भाऊ सरकारी नोकरीत. वहिनी मेडिकलमध्ये. बहीण पुण्याला वेलसेटल झालेली. अशी घरची आर्थिक स्थिती अत्यंत चांगली असताना अभिजीतचे लग्न २०११ मध्ये झाले. मात्र, काही दिवसांतच पत्नीसोबत टोकाची मतभिन्नता झाल्यामुळे अभिजीत आणि त्याची पत्नी विभक्त झाले.
दरम्यान, फिजिओथेरपिस्ट असलेली विशाखा त्याच्या जीवनात आली. प्रेमप्रकरण बहरले अन् त्यांनी २०१७ मध्ये विवाहही केला. त्यांचे चांगले सुरळीत होते. मात्र, सासरच्या मंडळींकडून नाक खुपसणे सुरू झाले. त्यानंतर, पुन्हा घरातील वादविवाद वाढला. अशात अभिजीत आणि विशाखाला वर्षभरापूर्वी एक गोड मुलगा झाला. संसारवेल बहरल्याने आता गोडीगुलाबी वाढेल, अशी अपेक्षा होती. मात्र, चार महिन्यांपासून त्यांच्यातील कुरबुरीचे स्वरूप तीव्र झाले.
पत्नी माहेरी निघून गेली. तो एकटाच भल्यामोठ्या फ्लॅटमध्ये राहात होता. पत्नी आणि मुलाला भेटायला गेलेल्या अभिजीतचा सासरी पाणउतारा होऊ लागला. मुलाचा पहिला बर्थ डे साजरा करण्यासाठी अभिजीत केक आणि गिफ्ट घेऊन गेला. मात्र, तो केक फेकून त्याच्यासोबत धक्काबुक्की करण्यात आली. मानसिकरीत्या पूर्णता कोलमडलेल्या अभिजीतने हा प्रकार घरच्यांना, मित्रांना सांगितला. त्यांनी त्याचे सांत्वनही केले, परंतु ती खोच त्याच्या जिव्हारी लागली.
वो झूट बोल रहा था...।
गेल्या आठवड्यात त्याच्याविरुद्ध पत्नीकडून हुंड्यासाठी छळ होत असल्याची तक्रार दाखल झाली. हे सर्व खोटे आहे, कुंभाड आहे, असे अभिजीतने ओरडून ओरडून सांगितले. मात्र, फायदा झाला नाही. त्याच्याविरुद्ध ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल झाला. त्यामुळे अभिजीत अंतर्मनातून बिखरला. त्याने शेवटची तयारी सुरू केली. मोबाइलवर ‘अलविदा जिंदगी’चे स्टेटस ठेवले.
आता सारेच शोकाकुल ‘‘मैं सच बोल रहा था, लोगों ने तमाशा बना दिया। वो झूठ बोल रहा था, लोगों ने तारीफ़ कर दी।
फिर वो दाैर आया...
हमने अपनी बाज़ी इस कदर हारी, की अब वो अफ़सोस करते रहे है...।।”
अभिजीत गुरुवारी रात्री कर्तव्यावर आला. त्याने रुग्णांवर हसतमुखपणे उपचार केले अन् सर्वांना दिलासा देत, स्वत: स्वत:ला भूल देणारे इंजेक्शन टोचून घेतले. अभिजीत कायमचा विसावला. ते कळाल्यानंतर त्याच्या घरचे, सासरचे सारेच धावत आले. आता सर्व शोकविव्हळ आहेत. अभिजीत मात्र निघून गेला. त्याने आपल्या भावना एका चिठ्ठीत लिहून त्याच्या मृत्यूला कारणीभूत असणाऱ्यांवर कडक कारवाईची मागणी नोंदविली आहे.
संबंधित बातमी : सासरच्या जाचाला कंटाळून डॉक्टरची आत्महत्या; भुलीच्या इंजेक्शनचा ओव्हरडोस घेऊन दिला जीव