लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर - उधार घेतलेले २५ लाख रुपये तीन महिन्यात परत करतो, असे आश्वासन देऊन एका ज्येष्ठ डॉक्टरांची फसवणूक करणारे व्हीनस हॉस्पिटलचे डॉ. राजेश तुळशीराम बघे (वय ४८) यांना पाचपावली पोलिसांनी अटक केली. या कारवाईमुळे वैद्यकीय वर्तुळात खळबळ निर्माण झाली आहे.
काटोल मार्गावर राहणारे डॉ. महेश गंगाराम कृपलानी आणि डॉ. बघे समव्यावसायिक असल्याने एकमेकांशी परिचित आहेत. त्यांच्यात अनेक वर्षांपासून मैत्रीपूर्ण संबंधही होते. त्याआधारे ईस्पितळात नवीन उपकरणे घेण्यासाठी तसेच नुतनीकरणासाठी डॉ. बघे यांनी डॉ. कृपलानी यांच्याकडून २५ लाख रुपये उधार घेतले. १६ एप्रिल २०२० ला हा व्यवहार झाला त्यावेळी बघेंनी कृपलानी यांना ९० दिवसांत तुमची रक्कम परत करेन, असे सांगितले होते. त्यावेळी आरोपी बघेंनी डॉ. कृपलानी यांना २५ लाखांचे तीन धनादेशही दिले होते. दरम्यान, ९० दिवसांनंतर कृपलानी यांनी बघेला आपली रक्कम परत मागितली असता ते टाळाटाळ करू लागले. वर्षभरापासून प्रत्येक वेळी रक्कम देण्यासाठी नवीन तारिख द्यायचे मात्र रक्कम काही परत करत नव्हते. दरम्यान, डॉ. कृपलानी यांनी बघेंनी दिलेले धनादेश बँकेत जमा केले असता ते बाऊन्स झाले. बघेंनी जाणीवपूर्वक फसवणूक केल्याचे ध्यानात आल्याने कृपलानी यांनी आर्थिक गुन्हे शाखेत तक्रार नोंदवली. त्याची चाैकशी केल्यानंतर वरिष्ठांनी पाचपावली ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानुसार, ठाणेदार संजय मेंढे यांनी पीएसआय भार्गव यांच्याकडून आज डॉ. बघे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्यांना अटक करण्यात आली असून, पीसीआरसाठी शुक्रवारी न्यायालयात हजर केले जाणार आहे.
बघेंचा अनेकांना गंडाडॉ. बघे यांनी अशा प्रकारे अनेकांना लाखोंचा गंडा घातल्याची जोरदार चर्चा वैद्यकीय वर्तुळात आहे. व्हीनस हॉस्पिटलमध्ये महागडी उपकरणे लावण्याच्या नावाखाली एकाला ९५ लाखांचा गंडा घातल्याचा एक गुन्हा यापूर्वी बघेंविरुद्ध दाखल झाला असल्याची माहिती पोलिसांनी दिली असून, बघेंनी अनेकांना अशा प्रकारे गंडा घातल्याचा संशयही व्यक्त केला आहे.