नागपूर : उमरेड रोडवर त्यांचा अपघात झाला. उपचारासाठी हॉस्पिटल गाठले. डॉक्टरांनी उपचारही केले. दरम्यान, उपराचारासाठी येणाऱ्या खर्चाची जुळवाजुळव करण्यासाठी कुटुंबीयांची चिंता वाढली. पण अशातच दुनियारी सोडून ‘दोस्ती’ कामी आली. रुग्ण बालमित्र असल्याचे डॉक्टरांच्या लक्षात आले. डॉक्टरांनी पूर्ण उपचार करून तब्बल सात लाख रुपयांचे बिल माफ केले. मित्राला असे अनोखे ‘फ्रेण्डशिफ्ट गिफ्ट’ देत मैत्रीचा धागा आणखी घट्ट केला.
उमरेड रोडवर २७ जुलै रोजी एका चारचाकीने विरुद्ध दिशेने येणाऱ्या दोन दुचाकींना धडक दिली. त्यात मागील दुचाकीवर असलेले केशवराव शेंडे व खासगी आयटीआयचे प्राचार्य अनिकेत शेंडे हे गंभीर जखमी झाले. त्यांना बेशुद्ध अवस्थेत मेडिक्युअर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यांचे दोन्ही हात, एक पाय फ्रॅक्चर झाला. ऑर्थोपेडिक सर्जन डॉ. आदित्य बोथरा यांनी एका पायाचे ऑपरेशन केले. उपचारादरम्यान अनिकेत शेंडे हे तर आपले बालमित्र असून आपण एकाच शाळेत शिकलो असल्याचे त्यांच्या लक्षात आले. अनेक वर्षांनंतर मित्राची भेट एक पेशंट म्हणून झाली. त्यानंतर डॉ. बोथरा यांनी आठ दिवस शेंडे यांच्यावर उपचार केले. सुटी देताना हॉस्पिटलने शेंडे यांच्याकडे बिलाची मागणी केली नाही. त्यावर शेंडे कुटुंबीयांनी डॉ. बोथरा यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी पैसे घेण्यास नकार देत मित्राला फ्रेण्डशिप गिफ्ट दिल्याचे सांगितले. हे ऐकून शेंडे कुटुंबीयांना गहिवरून आले. शेवटी त्यांनी डॉ. बोथरा यांना विनंती करून किमान एक लाख रुपये घेण्यास भाग पाडले.