- रक्कम जमा करण्यास विलंब
- क्रिस्टल नर्सिंग होममधील प्रकार
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : उपचाराची रक्कम जमा करण्यास विलंब होत असल्याचे पाहून रुग्णालय प्रशासनाने एका रुग्णाचे व्हेंटिलेटर काढून घेतले. त्यामुळे त्या रुग्णाचा मृत्यू झाल्याची खळबळजनक बाब उघड झाली आहे. या प्रकरणी रुग्णालय प्रशासनावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी तक्रार मृत दिलीपराव कडेकर यांचा मुलगा प्रणित याने गुरुवारी दुपारी पाचपावली पोलीस ठाण्यात नोंदविली.
न्यू सुभेदार लेआउट येथील दिलीपराव कडेकर यांना कोरोनाची बाधा झाल्यामुळे त्यांना २१ एप्रिलला पाचपावलीतील क्रिस्टल नर्सिंग होममध्ये दाखल करण्यात आले होते. प्रारंभीच हॉस्पिटल प्रशासनाकडे दोन लाख रुपये जमा करण्यात आले. त्यानंतर सांगितलेले औषध त्यांचा मुलगा प्रणितने हॉस्पिटल प्रशासनाला आणून दिले. दरम्यान, आतापर्यंत जो उपचार झाला त्याच्या बिलाबाबत दाखवा, असे प्रणितने म्हटले. क्रिस्टल हॉस्पिटलच्या प्रशासनाने दाखविलेल्या बिलावर प्रणितने आक्षेप नोंदविला. त्यामुळे प्रशासनाने यावेळी आपल्याला वडिलांच्या बाजूच्या बेडवर असलेल्या चौधरी नामक रुग्णाच्या नातेवाइकांसोबत फोनद्वारे झालेले संभाषण ऐकवले. यावेळी त्यांनी चौधरींची सपोर्ट सिस्टम काढून घेण्यात येईल, अशी धमकी दिली होती. हाच प्रकार तुमच्यासोबतही होऊ शकतो, असे आपल्यालाही धमकावून सांगण्यात आल्याचा प्रणितचा आरोप आहे. या प्रकारानंतर डॉक्टरांनी आपल्या वडिलांच्या उपचारांकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे त्यांची प्रकृती गंभीर झाली. त्यांना व्हेंटिलेटर लावण्यात आले होते. १२ मे रोजी डॉक्टरांनी पुन्हा पैसे जमा करण्यास सांगितले. आपण पैसे जमा करण्यासाठी काही वेळ मागितला असता डॉक्टरांनी १२ मे रोजी दुपारी व्हेंटिलेटर काढून घेतले. त्यामुळे काही वेळातच वडिलांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूला हॉस्पिटल प्रशासन कारणीभूत असल्यामुळे या प्रकरणात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, असे प्रणितने पाचपावली पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.
----
पोलिसांकडून प्रकरणाची चौकशी
गुरुवारी दुपारी प्रणित कडेकरने ही तक्रार पाचपावली ठाण्यात नोंदवली. यावेळी त्यांच्यासोबत माजी महापौर संदीप जोशी आणि इतर सहकारी होते. पोलिसांनी ती तक्रार स्वीकारली असून प्रकरण चौकशीसाठी ठेवले आहे. दरम्यान, हा प्रकार अत्यंत गंभीर असून पोलिसांनी हॉस्पिटल प्रशासनावर कडक कारवाई करावी, अशी मागणी माजी महापौर जोशी यांनी केली आहे.
---