नरेश डोंगरे ।
नागपूर : उपचार करण्याच्या नावाखाली मोठी रक्कम घेऊन डॉ. समीर पालतेवारांनी एका व्यक्तीला दृष्टिहीन केले. त्या व्यक्तीच्या जीवनातच नव्हे तर त्याच्या घरातही अंधार पेरला. या प्रकरणाची संबंधित प्रशासन आणि पोलिसांकडे तक्रारही झाली. मात्र, दोन वर्षे होऊनही बधिर प्रशासनाकडून पालतेवारांवर कारवाई झाली नाही.
अनेक घोटाळे अन् वादग्रस्त प्रकरणामुळे चर्चेत आलेल्या रामदास पेठेतील मेडिट्रिना हॉस्पिटलचे संचालक डॉ. पालतेवारांविरुद्ध शुक्रवारी सीताबर्डी पोलीस ठाण्यात पुन्हा एक गुन्हा दाखल झाला. मात्र, ४८ तास होऊनही पालतेवारांना अटक झालेली नाही. त्यामुळे पालतेवारांच्या पापाचे पुन्हा काही किस्से नव्याने चर्चेला आले आहेत.
पालतेवारांच्या अमानवीयतेचेे बळी ठरलेल्या उके कुटुंबाच्या वाट्याला आलेले हे प्रकरण कमालीचे संतापजनक आहे. संबंधित कुटुंबीयांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कळमन्याच्या ओमसाईनगरात विजय उके नामक गृहस्थ राहत होते. जानेवारी २०१८ पर्यंत ते एका लॉजमध्ये व्यवस्थापक म्हणून काम करायचे. त्यांच्या मिळकतीवरच कुटुंबाचा गाडा चालत होता. त्यांना व्यवस्थित दिसत नव्हते. त्यामुळे त्यांनी एका डोळ्याच्या डॉक्टरकडे उपचार केले. संबंधित डॉक्टरने त्यांना मेडिट्रिना हॉस्पिटलमध्ये जाण्याचा सल्ला दिला. त्यानुसार, पत्नी लिहिन्ता यांनी विजय यांना जानेवारी २०१८ मध्ये मेडिट्रिनात नेले. तेथे डॉ. पालतेवारांची भेट घेतल्यानंतर त्यांनी विजय यांच्या डोळ्याचे ऑपरेशन करण्याचा सल्ला दिला. ४० हजार रुपये खर्च येईल. मात्र, ऑपरेशननंतर विजय उके यांना सुस्पष्ट दिसेल, असे सांगितले. पैशाची जुळवाजुळव करीत उके परिवाराने २२ जानेवारीला भल्या सकाळी विजय उके यांना मेडिट्रिनात दाखल केले. ऑपरेशनची तयारी करणाऱ्या डॉक्टरांनी यावेळी ४० हजारांचा खर्च अचानक ८० हजारावर नेला. कसाबसा होकार देणाऱ्या उके कुटुंबीयांना याच डॉक्टरांनी नंतर हे ऑपरेशन क्लिष्ट असून त्यासाठी एकूण १ लाख रुपये खर्च येईल, असे सांगितले. एवढी रक्कम जमा करणे शक्य नसल्याचे उके कुटुंबीयांनी सांगितल्यामुळे मेडिट्रिनाच्या कर्मचाऱ्यांनी उके कुटुंबातील सदस्यांच्या काही कागदपत्रांवर सह्या घेतल्या.
विशेष म्हणजे, ऑपरेशन झाल्यानंतर विजय उके यांना काहीच दिसत नव्हते. त्यांनी पत्नी लिहिन्ताला ते सांगितले. त्यामुळे लिहिन्ता यांनी डॉ. पालतेवार यांची भेट घेतली. पालतेवारांनी तातडीचे उपचार करण्याऐवजी लवकरच त्यांना स्पष्ट दिसेल, असे सांगून उके यांना सुट्टी दिली. दरम्यान, सहा महिने होऊनही उके यांना काहीच दिसत नसल्याने त्यांचे नातेवाईक हादरले. ते वारंवार डॉ. पालतेवारांना भेटण्यासाठी जाऊ लागले अन् पालतेवार त्यांना टाळू लागले.
---
पोलिसांकडूनही न्याय नाही
आर्थिक आणि शारीरिक छळासोबतच प्रचंड मानसिक त्रास वाट्याला आलेल्या उके कुटुंबीयांनी ४ फेब्रुवारी २०१९ला सीताबर्डी पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला. उके यांची कैफियत ऐकून कुणालाही संताप यावा. मात्र, सीताबर्डी पोलिसांना काही वाटले नाही. दोन वर्षे होऊनही पोलिसांनी पालतेवाराच्या मुसक्या आवळण्याची आणि पीडित उके कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्याची हिम्मत दाखवली नाही.
---
मृत्यूने केली सुटका, जगण्याने छळले होते...
इकडे घरचा एकमात्र कमावता व्यक्ती आंधळा होऊन बसल्याने उके कुटुंबीयांच्या वाट्याला उपासमार आणि उपेक्षा आली. विजय उके यांची अवस्था तर फारच वाईट झाली होती. दृष्टिहीन झाल्याने त्यांचे प्रचंड हाल होऊ लागले अन् अखेर त्यांचे ९ ऑक्टोबर २०२० ला निधन झाले. विशेष म्हणजे, उके यांचे निधन ज्या दिवशी झाले, त्याच्या एक आठवड्यानंतर त्यांची मुलगी मीनाक्षीचा विवाह होणार होता, तोसुद्धा रद्द झाला.
---