सुमेध वाघमारे
नागपूर : डॉक्टरांवरील हल्ले हे डॉक्टर-रुग्णांमध्ये बिघडलेल्या नात्याचे प्रतिबिंब आहे. दरम्यानच्या या काळात हे प्रकर्षाने समोर आले आहे. यामुळे डॉक्टरांना संरक्षण देणाऱ्या कायद्याबरोबर रुग्णांबरोबरच्या संवादाला महत्त्व दिले पाहिजे. परंतु हा संवाद सुसंवाद असायला हवा, असा सूर ‘डॉक्टर्स डे’च्या पूर्व संध्येला शहरातील प्रतिष्ठित डॉक्टरांकडून उमटला.
- मानवी दृष्टिकोनातूनच डॉक्टरांची सेवा : डॉ. गजभिये
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राज गजभिये म्हणाले, रोग्याचे दु:ख निवारण करणे हे जसे डॉक्टरचे कर्तव्य असते, तसे त्यांच्याप्रति सहृदय संवेदना व्यक्त करणे, हे समाजाचे नैतिक कर्तव्य आहे. कुठलाही रुग्ण स्वखुशीने डॉक्टरांकडे येत नाही. त्याचा नाइलाज असतो. तेव्हा डॉक्टरांनी रुग्णाला धीर देत, सकारात्मक दृष्टिकोन ठेवून उपचार करणे आवश्यक आहे.
- डॉक्टर रुग्ण संबंध हा विश्वासावर आधारित : डॉ. मदन कापरे
कान, नका व घसा शल्य चिकित्सक डॉ. मदन कापरे म्हणाले, डॉक्टर व रुग्णाचा संबंध हा विश्वासावर आधारित आहे. हा विश्वास रुजविण्यासाठी दोघांमध्ये सुसंवादाची गरज आहे. हा संवादच नसल्याने वादाला तोंड फुटते. डॉक्टरांशिवाय समाज नाही आणि समाजाशिवाय डॉक्टर नाही. तंत्रज्ञान कितीही पुढे गेले तरी डॉक्टर डॉक्टरच राहतील. रुग्ण आणि डॉक्टरांमध्ये संवेदनशीलता होणे आवश्यक आहे.
- फॅमिली डॉक्टरांची संकल्पना पुन्हा रुजवायला हवी : डॉ. दंदे
डॉ. पिनाक दंदे म्हणाले, वेळेचा अभाव, कमी संवाद, महागडी उपचारपद्धती आणि उपचाराचा वाढलेला कालावधी यामुळे रुग्णांचा डॉक्टरांवरील विश्वास कमी होत आहे. फॅमिली डॉक्टर या संकल्पनेमुळेच विश्वास, माणुसकी, परस्परांचा विचार, सौजन्य अबाधित राहू शकते. ही संकल्पना पुन्हा रुजवायला हवी.
- डॉक्टरांचा आदर करण्याची मानसिकता हवी : डॉ. पवार
हृदयरोग शल्य चिकित्सक डॉ. निकुंज पवार म्हणाले, डॉक्टर आणि रुग्ण यांचे नाते दिवसेंदिवस गुंतागुंतीचे होत आहे. परिणामी, डॉक्टर-रुग्ण या नात्याकडे पुन्हा पाहण्याची गरज निर्माण झाली आहे. यासाठी रुग्ण आणि डॉक्टरांमध्ये संवेदनशीलता वाढण्याची आणि माणुसकीशी बांधीलकी मानून रुग्णसेवा करणारे डॉक्टरांचा आदर करण्याची मानसिकता निर्माण करण्याची आवश्यकता आहे.
- कायदा व रुग्णहितमध्ये अडकले डॉक्टर : डॉ. गिरी
इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) नागपूर शाखेचे पुढील वर्षीच्या अध्यक्ष डॉ. मंजूषा गिरी म्हणाल्या, एका बाजूला ग्राहक संरक्षण कायदा आणि दुसऱ्या बाजूला रुग्णहित. या संवेदनशील कात्रीत डॉक्टर अडकले आहेत. रुग्णांना कमीत कमी आर्थिक मोबदल्यात उत्तम सुविधा पुरविण्याच्या धावपळीत डॉक्टरांची दमछाक होते. ‘डॉक्टरर्स डे’च्या निमित्ताने डॉक्टर व रुग्णांच्या हितासाठी शासनाने पुढाकार घेणे आवश्यक आहे.