सुमेध वाघमारे
नागपूर : म्युकरमायकोसिसमुळे डोळे गमावलेले आता कुठे या भयावह आजारातून सावरत आहेत. मात्र, डोळ्याची खोबण (सॉकेट) तशीच राहिल्याने चेहरा विद्रूप दिसून अनेकांमध्ये न्यूनगंड निर्माण झाला आहे. डोळा गेल्याच्या नुकसानीपेक्षा या गोष्टींचा त्यांना असह्य त्रास होत आहे. यासाठी कृत्रिम डोळ्याची म्हणजे तिसऱ्या नेत्राची जबाबदारी शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयाने स्वत:वर घेतली आहे. (Doctors found a third eye for those who lost their eyes)
कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना म्युकरमायकोसिस अर्थात बुरशीचा आजार वेगाने पसरला. वेदनादायी व जीवघेणा या आजाराचे एकट्या नागपुरात दीड हजारावर रुग्ण आढळून आले. हा आजार प्रचंड खर्चिक आणि कुटुंब उदध्वस्त करणारा ठरला. सुरुवातीला नाक, घसा, डोळे आणि शेवटी मेंदू असा म्युकरमायकोसिसचा प्रवास होता. हे सर्व भाग अत्यंत नाजूक. ज्या अवयवापर्यंत ही काळी बुरशी पोहोचली तो भाग काढून टाकण्याशिवाय पर्याय नव्हता. यामुळे या आजारामुळे अनेकांना डोळे गमवावे लागले. एकट्या नागपूर जिल्ह्यात जवळपास ९० रुग्णांना एक डोळा कायमचा गमवावा लागला. तीन ते चार महिन्याच्या उपचारानंतर आता हे रुग्ण धोक्याबाहेर आले आहेत. परंतु खोबणीत डोळाच नसल्याने विद्रूप चेहरा घेऊन सामाजिक जीवन जगणे त्यांना कठीण जात आहे. अशांसाठी शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयाच्या कृत्रिम दंतशास्त्र विभागाने पुढाकार घेतला आहे. सुरुवातीला म्युकरमायकोसिसच्या १० रुग्णांना कृत्रिम डोळा बसवून देण्याची जबाबदारी घेतली आहे.
-हुबेहूब डोळ्यासारखा दिसणारा कृत्रिम डोळा
शासकीय दंत महाविद्यालयाच्या कृत्रिम दंतशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. अनिल खलीकर यांनी सांगितले, दंत रुग्णालयात ७०वर म्युकरमायकोसिसच्या रुग्णांवर उपचार करण्यात आले. यातील १० रुग्णांना आपला एक डोळा गमवावा लागला. त्यांच्यासाठी हुबेहूब डोळ्यासारखा दिसणारा कृत्रिम डोळा दिसण्याची जबाबदारी विभागाने घेतली आहे. रुग्णांची खोबणीचे माप, दुसऱ्या डोळ्याचा रंग, चेहऱ्याचा रंग आदी सर्व गोष्टी लक्षात घेऊन कृत्रिम डोळा तयार केला जात आहे. यामुळे समोरच्या व्यक्तीला दोन्हींमधील फरक ओळखणेसुद्धा अवघड जाईल.
-डोळाच नाही तर कृत्रिम कान व नाकही
डॉ. खलीकर म्हणाले, एखाद्या अपघातामुळे चेहरा विद्रूप होतो. ‘मॅक्सीलो फिशल’ शस्त्रक्रियाने त्यांचा चेहरा पूर्ववत केला जातो. परंतु काहींना कृत्रिम टाळू, नाक व कानाचीही गरज पडते. शासकीय दंत रुग्णालयातील हा विभाग कृत्रिम दंत असला तरी आम्ही रुग्णाना कृत्रिम डोळ्यांसोबतच हे कृत्रिम अवयव उपलब्ध करून देतो. आतापर्यंत १०० कृत्रिम टाळू, ११ कृत्रिम डोळे, ५ कृत्रिम नाक व ४ कृत्रिम कान रुग्णांना उपलब्ध करून दिले आहे. विशेष म्हणजे, हे अवयव लावणे व काढणे सहज सोपे असते.