अतुल कुलकर्णी यांचे आवाहन : सोसायटी आॅफ क्रिटीकल केअर मेडिसीनची नवीन कार्यकारिणीलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : डॉक्टरांवरील हल्ले हे डॉक्टर-रुग्ण बिघडलेल्या नात्याचे प्रतिबिंब आहे. डॉक्टरांना संरक्षण देणाऱ्या कायद्याबरोबर रुग्णाबरोबरच्या संवादाला महत्त्व दिले पाहिजे. परंतु अनेकवेळा कामाच्या व्यस्ततेमुळे डॉक्टरांना संवाद साधणे शक्य होत नाही. विशेषत: अतिदक्षता विभागातील डॉक्टरांना अनेकवेळा हीच बाब अडचणीची जाते. संवाद नीट नसल्याने अनेकवेळा गैरसमज निर्माण होऊन वादाला तोंड फुटते. म्हणूनच या विभागातील डॉक्टरांनी रुग्णांच्या नातेवाईकांशी बोलताना संवाद सांभाळावा, असे आवाहन टाटा मेमोरिअल हॉस्पिटलचे अत्यवस्थ सेवासुश्रुषातज्ज्ञ डॉ. अतुल कुळकर्णी यांनी येथे केले.‘सोसायटी आॅफ क्रिटीकल केअर मेडिसीन’, नागपूर विभागाचा पदग्रहण सोहळा रविवारी पार पडला. यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. मंचावर डॉ. सुभल दीक्षित, प्रसिद्ध मनोचिकित्सक डॉ. सुधीर भावे, नवनिर्वाचित अध्यक्ष अध्यक्ष डॉ. निखील बालंखे, सचिव डॉ. आशिष गांजरे, डॉ. इम्रान नूर मोहम्मद, माजी अध्यक्ष डॉ. दीपक जैस्वानी व सचिव डॉ. कमल भुतडा उपस्थित होते. डॉ. सुभल दीक्षित यांनी अतिदक्षता विभागातील रुग्णांच्या पोषक आहारावर लक्ष वेधले. ते म्हणाले, गंभीर रुग्णांवर उपचार करताना त्याच्या आहाराचेही नियोजन करणे आवश्यक आहे. तोंडावाटे आहार घेणारे रुग्ण लवकर बरे होतात, असेही ते म्हणाले. डॉ. सुधीर भावे यांनी रुग्णाच्या आजाराची, उपचाराची व मृत्यूची माहिती देताना नातेवाईकांशी साधला जाणारा संवाद यावर भर दिला. रुग्णाचे नातेवाईक कुठे ‘अॅग्रेसीव्ह’ होतात, त्यावर नियंत्रण कसे मिळविता येईल, याची माहिती दिली. दरम्यान, डॉ. निखील बालंखे यांनी अध्यक्षपदाची तर डॉ. आशिष गांजरे यांनी सचिवपदाची सूत्रे स्वीकारली. सोबतच कोषाध्यक्ष डॉ. इम्रान नूर मोहम्मद, कार्यकारी सदस्य डॉ. शाहनवाज सिद्दीकी, डॉ. तुषार पांडे, डॉ. प्रकाश ढोके, डॉ. रितेश चव्हाण, डॉ. विनय कुळकर्णी, डॉ. वीरेंद्र भेलकर आदींनीही पदभार स्वीकारला. कार्यक्रमाचे संचालन डॉ. निता देशपांडे यांनी केले.
अतिदक्षता विभागातील डॉक्टरांनो संवाद सांभाळा
By admin | Published: June 27, 2017 2:02 AM