डॉक्टरांच्या आत्महत्या थांबविण्यासाठी होणार होते प्रयत्न : मार्डच्या विनंतीला दिली होती मंजुरी सुमेध वाघमारे नागपूर निवासी डॉक्टरांना देण्यात येणाऱ्या सुविधा, कामाचा ताण आणि यातून येणाऱ्या नैराश्यामधून गेल्या दोन वर्षांत राज्याच्या विविध मेडिकल कॉलेजच्या आठ डॉक्टरांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. याला घेऊन राज्य आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिकने दरवर्षी निवासी डॉक्टरांची मानसिक व शारीरिक तपासणी करण्याच्या सूचना सर्व मेडिकल कॉलेजला दिल्या होत्या. परंतु वर्ष होऊनही निवासी डॉक्टरांची मानसिक तपासणी झालीच नाही. आरोग्याच्या आणि सोई-सुविधांच्या प्रश्नावरून राज्यातील निवासी डॉक्टर नेहमी आंदोलन करीत असतात. मात्र, निवासी डॉक्टरांचे अनेक प्रश्न अद्यापही सुटलेले नाहीत. यातच बहुतांश मेडिकलमध्ये वाढलेल्या रुग्णांची संख्या, त्यांच्या सोयींचा अभाव, वाढलेले कामाचे तास, त्यातून येणारा ताण, वेळी-अवेळी झोप यामुळे निवासी डॉक्टर विविध विकारांच्या विळख्यात सापडतात. यातून आलेल्या नैराश्यामुळे २०१५ मध्ये मुंबई, पुणे, आंबेजोगाई, औरंगाबाद व नागपुरातील मेडिकलच्या पदव्युत्तर (पीजे) विद्यार्थिनीने आत्महत्येचा प्रयत्न केला. आॅक्टोबर २०१५ मध्ये दारू पिऊन गाडी चालविणाऱ्या पाच निवासी डॉक्टरांनी पोलिसांसोबत हुज्जत घातल्याने सहा महिन्यांसाठी त्यांना निलंबित करण्यात आले होते. जानेवारी २०१६ मध्ये औरंगाबाद येथील निवासी डॉक्टराने आपला अभ्यासक्रम पूर्ण केल्याच्या काही दिवसांतच त्याला हृदयविकाराचा झटका आला. यात त्याचा मृत्यू झाला. याची दखल सेंट्रल मार्डचे अध्यक्ष डॉ. सागर मुंधडा यांनी घेतली. त्यांनी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिकला दर सहा महिन्यातून एकदा निवासी डॉक्टरांची मानसिक व शारीरिक आरोग्य तपासणी करण्याची विनंती केली. हा प्रस्ताव वैद्यकीय विद्याशाखेच्या पदव्युत्तर अभ्यासमंडळाच्या बैठकीत चर्चेस्तव ठेवण्यात आला. यात पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षी प्रवेश घेणाऱ्या निवासी डॉक्टरांकडून वैद्यकीय प्रमाणपत्र घेण्यात यावे व प्रत्येक वर्षात आवश्यकतेनुसार संबंधित निवासी डॉक्टराची शारीरिक व मानसिक आरोग्य तपासणी करावी व त्यास अनुसरून समुपदेशन करण्यात यावे, असा ठराव पारित करण्यात आला. परंतु वर्षे झाले निवासी डॉक्टरांची तपासणीच झाली नाही.
डॉक्टरांच्या मानसिक तपासणीचा मेडिकलला विसर
By admin | Published: February 27, 2017 2:03 AM