लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अन्य कुठलाही व्यवसाय असा नाही की, त्यांचे क्लायंट त्यांच्यावर हल्ले करतात. न्याय मिळाला नाही म्हणून वकिलांवर हल्ला होताना कधी बघितले आहे का? मात्र, डॉक्टरांवर हल्ले होतात, कारण ते संघटित नाहीत. त्यामुळे आपले प्रश्न सोडविण्यासाठी डॉक्टरांनी संघटित व्हावे, असे आवाहन आयएमएचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. शंतनु सेन यांनी व्यक्त केले.इंडियन मेडिकल असोसिएशनच्या नागपूर शाखेद्वारे महाएएमएसकॉन आणि १७ वी वार्षिक परिषद निमॅकॉन-२०१९चे उद्घाटन उत्तर अंबाझरी मार्गावरील आयएमएच्या सभागृहात करण्यात आले. या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून डॉ. सेन बोलत होते. यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र आयएमएचे अध्यक्ष डॉ. होजी कपाडिया, राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. अनिल पचनेकर, महाराष्ट्र आयएमएचे सचिव डॉ. सुहास पिंगळे, महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे अध्यक्ष डॉ. शिवकुमार उत्तुरे, माजी राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अशोक अढाव, आयएमए-एमएस-एएमएसचे अध्यक्ष डॉ. संजय देशपांडे, सचिव डॉ. राजीव अग्रवाल, महाराष्ट्र आयएमएचे पुढील अध्यक्ष अविनाश भोंडवे, माजी अध्यक्ष डॉ. वाय.एस. देशपांडे, नॅशनल पीपीपीचे अध्यक्ष डॉ. कृष्णा पराते, आयएमए नागपूरचे अध्यक्ष डॉ. कुश झुनझुनवाला, सचिव डॉ. मंजुषा गिरी, राष्ट्रीय फायनान्स सेक्रेटरी डॉ. रमेशकुमार दत्ता, राष्ट्रीय सहसचिव डॉ. संजिब बंडोपाध्याय उपस्थित होते.डॉक्टर संघटित झाले नाही तर भविष्यात परिस्थिती अधिक बिकट होईल असे सांगत त्यांनी आयएमएच्या यशस्वी लढ्यांची माहिती दिली. ते म्हणाले की, लोकांना वाटते की डॉक्टर स्वार्थी असतात. मात्र, एनएमसी विधेयकामुळे सामान्य व्यक्ती प्रभावित होणार आहे. ग्रामीण भागात कुणीही डॉक्टर म्हणून औषधोपचार करू शकेल. याबद्दल मात्र सामान्य नागरिकांना माहीत नाही. आयएमएचा लढा त्या सामान्य नागरिकांसाठी आहे असे सांगत डॉ. सेन यांनी सामान्य नागरिकांना एनएमसी विधेयकामुळे होणारे दुष्परिणाम पटवून देण्याचे आवाहन केले. सोबतच आपल्या सहकारी डॉक्टरांनाही आयएमए विधेयकासंबंधात जागृती करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. यावेळी ग्राहक संरक्षण कायद्यातून वैद्यकीय सेवा वगळण्याच्या आयएमएच्या यशस्वी लढ्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.आपले रुग्ण, त्यांचे नातेवाईक आणि समाजातील प्रत्येकाला एनएमसी विधेयकाविरोधात आपण का आहोत, हे पटवून देत प्रधानमंत्र्यांना या विधेयकातील तरतुदींच्या विरोधात ई-मेल पाठवण्यास प्रोत्साहित करा, असेही त्यांनी यावेळी आवाहन केले.प्रास्ताविक डॉ. कुश झुनझुनवाला यांनी केले. महाएएमएसकॉनची माहिती डॉ. संजय देशपांडे यांनी दिली. डॉ. प्रकाश देव यांनी डॉ. व्ही.एन. वानकर जीवनगौरव पुरस्काराची घोषणा केली. प्रसिद्ध न्युरोलॉजिस्ट डॉ. चंद्रशेखर मेश्राम यांना मानाचा डॉ. व्ही.एन. वानकर पुरस्कार डॉ. सेन यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. गेली ४५ वर्षे आयएमएच्या नागपूर कार्यालयात सेवा देणारे दत्तात्रय ऊर्फ राजीव प्रभाकर दलाल यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. मूकबधिर विद्यालय शंकरनगरला निधी प्रदान करण्यात आला. डॉ. अनुराधा रिधोरकर यांनी या पुरस्काराची घोषणा केली. संचालन डॉ. अंजु कडू आणि डॉ. वर्षा झुनझुनवाला यांनी केले. आभार डॉ. मंजुषा गिरी यांनी व्यक्त केले.अधिक कार्य करण्याची प्रेरणा : डॉ. मेश्रामडॉ. वानकर माझे शिक्षक होते. समाजसेवेसाठी त्यांनी नेहमीच प्रेरित केले. मागे वळून बघितले तर अनेक संस्था आणि लोकांनी मला सहकार्य केले. त्या सर्वांप्रति कृतज्ञता व्यक्त करतो. अधिक चांगले कार्य करीत मोठे काहीतरी मिळवायचे आहे, असा संदेश या पुरस्काराने मिळाला आहे, असे भावोद््गार डॉ. चंद्रशेखर मेश्राय यांनी यावेळी काढले. या प्रसंगी त्यांचे वडील डॉ. महादेवराव मेश्राम उपस्थित होते.