ख्रिश्चन व्यक्तीला मूल दत्तक घेण्याचा अधिकार आहे का?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2018 10:46 AM2018-12-03T10:46:08+5:302018-12-03T10:47:15+5:30
हिंदू दत्तकविधान कायद्यानुसार ख्रिश्चन व्यक्तीला मूल दत्तक घेण्याचा अधिकार आहे किंवा नाही, हा महत्त्वपूर्ण प्रश्न मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात पोहोचला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : हिंदू दत्तकविधान कायद्यानुसार ख्रिश्चन व्यक्तीला मूल दत्तक घेण्याचा अधिकार आहे किंवा नाही, हा महत्त्वपूर्ण प्रश्न मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात पोहोचला आहे. या प्रकरणावरील निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दक्षिण पूर्व मध्य रेल्वेमध्ये २६ नोव्हेंबर २००७ पासून कार्यरत असलेल्या प्रेसिल्ला अॅन्थोनी जोसेफ यांनी सख्ख्या पुतणीला दत्तक घेतल्याचे सांगून, तिचे नाव रेकॉर्डवर नोंदवून घेण्याची विनंती केली होती. यासंदर्भात त्यांनी ६ डिसेंबर २०१० रोजी अर्ज सादर केला होता. रेल्वेने ९ सप्टेंबर २०११ रोजी तो अर्ज फेटाळून लावला. हिंदू दत्तकविधान कायद्यामध्ये ख्रिश्चन व्यक्तीने मूल दत्तक घेण्याविषयी तरतूद नसल्याचे कारण अर्ज फेटाळताना देण्यात आले. त्यामुळे प्रेसिल्ला यांनी केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरणात धाव घेतली. ४ जून २०१८ रोजी न्यायाधिकरणने रेल्वेचा निर्णय कायम ठेवून प्रेसिल्ला यांचा अर्ज खारीज केला, तसेच त्यांच्यावर २५ हजार रुपये दावा खर्च बसवला. परिणामी, त्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. उच्च न्यायालयाने प्रकरण ऐकल्यानंतर दक्षिण पूर्व मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक व वरिष्ठ विभागीय कार्मिक अधिकारी यांना नोटीस बजावली. याचिकाकर्तीतर्फे अॅड. एच. आय. कोठारी यांनी बाजू मांडली.