नागपूर - शाळा-महाविद्यालयांमध्ये लागू केलेले अभ्यासक्रमच जिथे पूर्णपणे शिकवले जात नाहीत तेथे भगवत् गीतेसारख्या पवित्र ग्रंथाचे अध्ययन करण्याचा अट्टहास साधून काय होणार आहे? अशी विचारणा करून, खुद्द शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी तरी गीता वाचली आहे का, असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी सभागृहाबाहेर पत्रकारांसोबत बोलताना उपस्थित केला.
महाविद्यालयांमध्ये भगवत् गीतेचे अध्ययन करण्याबाबतच्या सरकारच्या धोरणावर त्यांनी यावेळी हल्ला चढवला. गीतासारख्या पवित्र ग्रंथाचे वाटप करून साय साध्य होणार आहे, हा हिंदुत्ववादाचा एक छुपा अजेंडा सरकार राबवीत आहे. राज्यात अनेक महाविद्यालयांमध्ये नेहमीचाच अभ्यासक्रम पूर्ण केला जात नाही. तेथे गीता वाचण्याची सक्ती विद्यार्थ्यांवर कशासाठी केली जात आहे?. विकासाचा अजेंडा २०१९ च्या निवडणुकीत चालणार नाही हे भाजपाच्या लक्षात आल्याने त्यांनी आता हिंदुत्वाचा मोहरा चालवणे सुरू केले आहे. विनोद तावडे यांनी स्वत: कधीतरी गीतेचे वाचन केले आहे काय असा प्रश्न विचारून जयंत पाटील यांनी, जर त्यांनी स्वत: वाचली नसेल तर इतरांना ती वाचायला देण्याचे काही कारण नाही असे म्हटले.
कल्याण-डोंबिवली भागातील खड्डे आणि रस्त्यांच्या दूरवस्थेबद्दल बोलताना त्यांनी, ज्या चार व्यक्तींचे मृत्यू झाले त्याची जबाबदारी सरकारवर असल्याचे मत व्यक्त केले. या भागातील नागरिकांना आपण भाजपाला मत दिले याचा आता खेद होत असावा असेही ते पुढे म्हणाले.