लाेकमत न्यूज नेटवर्क
खात : काेराेना संक्रमण राेखण्यासाठी शासनाने आठवडी बाजार बंदीचे आदेश दिले आहेत. परंतु खात येथे नियमांचे उल्लंघन करीत बुधवारी (दि.३) गावातील मुख्य रस्त्यावर आठवडी बाजार भरविण्यात आला. ऐन मुख्य रस्त्यावर बाजार भरला असतानाही ग्रामपंचायत प्रशासनाकडून कुठलीही कारवाई अथवा उपाययाेजना करण्यात आली नाही. त्यामुळे इथे काेराेनाचा संसर्ग पसरत नाही काय, असा प्रश्न उपस्थित हाेत आहे.
दुसऱ्या टप्प्यातील काेराेना संक्रमण नियंत्रणात आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाने ७ मार्चपर्यंत आठवडी बाजार तसेच इतर बाबींवर बंदी घातली असून, घराबाहेर पडताना मास्क वापरणे आणि फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करणे अनिवार्य केले आहे. त्यातच गर्दी करणे किंवा गर्दीत जाणे टाळण्याचे तसेच याचे उल्लंघन केल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र खात येथील मुख्य रस्त्यावर भरलेल्या बाजारात शासनाच्या नियमावलीचा बाेजवारा उडाल्याचे दिसून आले. या बाजारात दुकानदार, विक्रेते तसेच ग्राहक कुणीही शारीरिक अंतर पाळताना तसेच मास्कचा वापर करताना दिसले नाही.
विशेष म्हणजे, मुख्य वर्दळीच्या या रस्त्यावरून गावातील गुरे सायंकाळी शिवारातून आल्यानंतर घराकडे जातात. अशावेळी बाजारात नागरिकांची गर्दी तसेच गुरांचा वावर यामुळे एखाद्यावेळी अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. असे असतानाही बाजाराच्या नियाेजित जागेत दुकाने न थाटता थेट मुख्य रस्त्यावर बाजार भरविला जात आहे.
खात येथील बाजारात परिसरातील १० ते १५ गावातील नागरिकांचा संपर्क येताे. त्यामुळे काेराेनाच्या नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. असे असताना अतिशय दाटीवाटीने नियम डावलून हा बाजार भरविला जात आहे. याकडे स्थानिक प्रशासनाचे दुर्लक्ष हाेत आहे. अशीच स्थिती कायम राहिल्यास ग्रामीण भागात काेराेना संक्रमण वाढण्यास वेळ लागणार नाही, अशा प्रतिक्रिया नागरिकात व्यक्त हाेत आहेत.