नागपूर : कुत्र्याची शिकार करण्यासाठी त्याचा पाठलाग करणे बिबट्याच्या जीवावर बेतले. पाण्याच्या टाक्यात पडून या दोघांचाही मृत्यू झाल्याची घटना हिंगणा तालुक्यातील दाभा येथील शेतशिवारत घडली.
हे घटनास्थळ हिंगणा वन परीक्षेत्रात येते. विजय काकडे यांच्या शेतात पाणी साठविण्याचे खोल टाके आहे. त्यात पाणी साठलेले होते. बिबट्याने कुत्र्यांचा पाठलाग करताना तो पाण्याच्या टाक्यात पडला. पाठोपाठ बिबट्याही पडला. या घटनेत दोघांचाही मृत्यू झाला. शेतमालक विजय काकडे आणि विपीन नायर यांच्या लक्षात हा प्रकार आल्यावर त्यांनी वन विभागाला माहिती दिली.
हिंगणाचे वनपरिक्षेत्र अधिकारी आशिष निनावे, यांनी आपल्या पथकासह घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. अडीच मिटर खोल पाण्यात मृतावस्थेत असलेल्या बिबट्याला पाण्याबाहेर काढले असता ती मादी बिबट असून ५ ते ६ वर्षांची असल्याचे लक्षात आले. राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या निर्देशानुसार राज्य वन्यजीव सल्लागार मंडळाचे सदस्य कुंदन हाते, मानद वन्यजीव रक्षक अविनाश लोंढे, सौरभ सुखदेवे यांच्या उपस्थितीत बिबट्याचे शवविच्छेदन करून अग्निसंस्कार करण्यात आले. उपवनसंरक्षक भरतसिंग हाडा यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक वन संरक्षक एस. टी. काळे यांच्या उपस्थितीत पशुधन विकास अधिकारी डॉ. सय्यद बिलाल, लांजेवार यांनी ही प्रक्रिया केली. व्हिसेराचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.