लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दात खराब झाल्यानंतर आपण त्यावर उपचार करतो. परंतु मनुष्याप्रमाणे प्राण्यांचेही दात खराब होतात. खराब झालेला दात दुखतो. त्यामुळे प्राण्याचे वर्तन बदलून तो हिंसक होऊ शकतो. त्यामुळे या बाबतीत पुढाकार घेऊन नागपुरातील युवा दंत चिकित्सक डॉ. रोशन साखरकर यांनी एका मोकाट कुत्र्यावर रुट कॅनलचा उपचार केला असून अशा प्रकारचा उपचार प्राण्यावर करण्याचा हा पहिला प्रयोग असल्याचा दावा त्यांनी केला आहे.प्राण्यांचा दात खराब झाला की त्यांची वागणूक बदलून ते चीडचीड करतात. अनेकदा ते हिंसक होतात. एका मोकाट कुत्र्याला अन्न देताना त्याचा सुळा दात तुटल्यामुळे तो कुत्रा चिडचिड्या स्वभावाचा झाल्याचे डॉ. रोशन साखरकर यांच्या लक्षात आले. त्यांनी त्या कुत्र्यावर रुट कॅनलचा उपचार करण्याचे ठरविले. त्यासाठी त्यांनी व्हेटरनरी सर्जन डॉ. आशिष होले, डॉ. स्वप्नील नागमोते,असिस्टंट प्रकाश यांची मदत घेऊन छत्रपती चौकातील अद्ययावत शस्त्रक्रियागृहात या कुत्र्याच्या दातावर रुट कॅनलचा उपचार केला. प्राण्यावर रुट कॅनलचा उपचार होण्याची ही पहिलीच वेळ असल्याचा दावा डॉ. साखरकर यांनी केला आहे. यापूर्वी २०१३ मध्ये इंग्लंडमधील डॉक्टरांच्या चमूने भारतातील अस्वलावर आग्रा येथील रेस्क्यु सेंटरमध्ये रुट कॅनलची ट्रीटमेंट केली होती. अशा प्रकारचा उपचार प्राण्यांवर करण्यासाठी पशुवैद्यक, दंत चिकित्सकांनी पुढाकार घेऊन गरजू आणि मुक्या प्राण्यांची वेदनेपासून सुटका करावी, असे आवाहन डॉ. साखरकर यांनी केले आहे. भविष्यात मोकाट जनावरे आणि जंगली प्राण्यांवर मोफत उपचार करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला आहे.
तुटलेल्या दातांमुळे वाघ होऊ शकतात नरभक्षीअनेकदा तुटलेल्या सुळ््या दातांचे दुखणे वाढल्यामुळे वाघ नैसर्गिक शिकार करू शकत नाही. त्यामुळे ते सोप्या शिकारीकडे वळतात. यात माणूस, गुरे, ढोरांची शिकार ते करतात. परंतु नॅशनल टायगर कन्झर्व्हेशन अॅथारिटीच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार नैसर्गिक प्रक्रियेत हस्तक्षेप करण्यात येत नाही. त्यामुळे शिकार करण्यास सक्षम नसलेल्या वाघांपुढे भुकेने मृत्युमुखी पडणे किंवा माणसाची, जनावरांची शिकार करणे हेच पर्याय उरतात. त्यासाठी दरवर्षी वाघाची शारीरिक, मानसिक आणि दंत तपासणी करण्याची गरज असल्याचे डॉ.साखरकर यांनी सांगितले. नरभक्षी वाघाच्या दातांबाबतचा कोणताच वैज्ञानिक डाटा उपलब्ध नसून वाघांचे शवविच्छेदन करताना त्यांच्या दातांचा सूक्ष्म अभ्यास करून त्यांच्या दातांचे माप घेण्याची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.