लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पाळीव कुत्र्यांची काळजी सारेच घेतात. मात्र भटक्या कुत्र्यांच्या वेदना कुणी पाहाव्या? नागपुरातील श्वानप्रेमींनी पुढाकार घेतला. पंजावर साडेतीन किलोचा ट्युमर घेऊन वेदनेसह जगणाऱ्या एका कुत्र्यावर त्यांनी डॉक्टरांच्या मदतीने शस्त्रक्रिया केली. ट्युमर काढून पाय दुरुस्त झाल्यावर पुन्हा त्याला त्याच्या अधिवासात सोडले.
पशुसंवर्धन विभागाने करावे, ते काम या श्वानप्रेमींनी केले. पारडीलगतच्या पुनापूर गावामध्ये पशुप्रेमी जय हुकूम यांना एका भटक्या श्वानाच्या मागील पायाच्या पंजाला मोठा ट्युमर झाल्याचे दिसले. त्याला चालताही येत नव्हते. वेदनाही प्रचंड होत होत्या. या अवस्थेतही स्थानिक नागरिक आणि अन्य कुत्र्यांकडून त्याला त्रास सुरूच होता. जय हुकूम यांनी ही अवस्था पाहून त्याचे फोटो काढले, मोबाईलवरून व्हिडीओ क्लिपिंग तयार केली. ती माहिती स्वप्निल बोधाने यांना दिली. ही माहिती सोशल मीडियावर टाकली व मदतीचे आवाहन केले.
बोधाने यांनी पशुचिकित्सक डॉ. मयूर काटे यांच्याशी चर्चा केली. त्यांनी शस्त्रक्रियेची तयारी दर्शविली. डॉग रेस्क्यू टीमचे पवन झकरेल, संजय समुद्रे आणि पशुप्रेमी संस्थेच्या चमूने पुनापूरला जाऊन डॉग कॅचिंग नेटच्या मदतीने त्याला पकडले व डॉ. काटे यांच्या रुग्णालयात आणले. तिथे सुमारे दोन तास शस्त्रक्रिया करून साडेतीन किलोचा ट्युमर वेगळा केला. शस्त्रक्रियेनंतर जखम सुकणे आवश्यक असल्याने त्याला भांडेवाडी येथील पशुनिवारा केंद्रात ठेवण्यात आले. डॉ. आशिष जयस्वाल, संतोष कुलभजे यांनी उपचार केले. भोजनाची व्यवस्था हेल्पिंग हॅण्ड संस्थेचे चार्ल्स लिओनार्ड यांनी केली. श्वान दुरुस्त झाल्यावर त्याला मूळ अधिवासात सोडण्यात आले.
सोशल मीडियावर पोस्ट वाचून अनेकांनी मदत केली. तर शस्त्रक्रियेसाठी पीपल फॉर ॲनिमल युनिट-२, आर.ए.डी. बहुउद्देशीय संस्था, वर्को ऑर्गनायझेशन या संस्थांनी मदत केली. स्वप्निल बोधाने यांच्यासोबत आशिष कोहळे, राजेश, नीलेश रामटेके यांचीही मदत महत्त्वाची ठरली.