नागपूर: महापालिकेद्वारे एनजीओमार्फत चालविण्यात येत असलेल्या भांडेवाडा श्वान संरक्षण गृह (श्वान शेल्टर हाेम) मधील व्यवस्थेबाबत व्हायरल हाेत असलेल्या व्हिडीओमुळे प्राणीप्रेमी नागरिकांमध्ये संतप्त भावना व्यक्त हाेत आहेत. या शेल्टर हाेममध्ये श्वानांना प्रचंड हाल सहन करावे लागत असून नागरिकांनी महापालिकेच्या कारभरावर संताप व्यक्त केला आहे.
भांडेवाडी येथील शेल्टर हाेम महापालिकेने एका एनजीओला चालवायला दिले आहे. या शेल्टर हाेममधील अवस्थेबाबत आधीही नागरिकांनी तक्रारी केल्या आहेत. शेल्टर हाेममध्ये अतिशय अस्वच्छ वातावरण आहे. येथे श्वानांवर नसबंदी शस्त्रक्रिया करण्यासाठी आवश्यक वैद्यकीय उपकरणे नाहीत, शस्त्रक्रियेनंतर अवयवांची विल्हेवाट लावण्यासाठी सुविधा नसून हे अवयव खुल्यावर फेकले जात असल्याचे सांगण्यात येत आहे. शिवाय येथील सीसीटीव्ही कॅमेरे देखील सुरू नाहीत. येथे आणलेल्या श्वानांचा तडफडून मृत्युही हाेताे. अशा अवस्थेमुळे भारतीय प्राणी कल्याण मंडळाने भांडेवाडी नसबंदी केंद्र व शेल्टर हाेमवर बंदीही आणली हाेती. काही दिवस बंद ठेवल्यानंतर मंडळाची परवानगी न घेता हे केंद्र पुन्हा सुरू करण्यात आले. यावर सेव्ह स्पीचलेस ऑर्गनायझेशनच्या प्राणीप्रेमी स्मिता मिरे यांनी न्यायालयात तक्रार देखील दाखल केली आहे.
श्वानांचा तडफडून हाेताे मृत्युएका प्राणीप्रेमीने आपल्या माेबाईल कॅमेराने भांडेवाडी शेल्टर हाेमचा व्हिडीओ शुट केला आहे. हा व्हिडीओ साेशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर इतरही प्राणीप्रेमींनी त्यावर संताप व्यक्त करीत अनुभव सांगितले आहेत.
- अनेक वर्षापासून अतिशय वाईट अवस्था असल्याचे म्हटले आहे.
- येथे प्राण्यांसाठी डाॅक्टर राहत नाही. श्वानांना खायलाही दिले जात नाही. जखमी श्वानांचा तडफडून मृत्यु हाेताे पण त्याच्यावर उपचार केले जात नसल्याचे एकाने नमूद केले.
- हे शेल्टर हाेम नसून प्राण्यांचे कारागृह असल्याचा व अक्षरश: राक्षसी प्रवृत्तीने श्वानांचे हाल केले जात असल्याचा संताप काहींनी व्यक्त केला.
- महापालिका प्रशासन हे सर्व उघड्या डाेळ्यांनी पाहत असून प्राणी संवर्धनासाठी येणाऱ्या निधीत भ्रष्टाचार करण्यासाठी कारवाई केली जात नसल्याचा आराेप नागरिकांनी केला आहे.
"श्वानांच्या अवस्थेचा व्हिडीओ बघून संताप येत आहे. याबाबत महापालिका आयुक्तांकडे तक्रार केली असून ते काही कारवाई करतात की दुर्लक्ष करून जबाबदारी झटकतात, हे बघावे लागेल."- स्मिता मिरे, संचालक, सेव्ह स्पीचलेस ऑर्गनायझेशन