नागपूर : भरपूर पैसा मिळतो, लाईफस्टाईल उत्तम होते आणि गर्लफ्रेण्ड-बॉयफ्रेण्ड लवकर मिळतो, अशी अनेक कारणे एमबीए करण्यासाठी दिली जातात. इतर कारणे थोड्याफार फरकाने खरी असली तरी जोडीदार मिळविण्यासाठी कोणी एमबीए करत असेल तर हा स्वत:ला दिलेला धोका असल्याचे मत नीरज हुद्दार यांनी व्यक्त केले.
पत्रभेट मंडळाच्यावतीने आयोजित झेप व्याख्यानमालेत गुगलचे प्रिन्सीपल अकाऊंट मॅनेजर नीरज हुद्दार यांनी 'एमबीए ऑर नॉट : हाऊ टू डिसाईड व्हॉट्स राईट फॉर यू' विषयावर आपले विचार मांडले.
भारतातील विद्यार्थी एमबीएला प्रवेश केवळ पालक म्हणतात किंवा आजूबाजूच्या लोकांना वाटते म्हणून घेत असतात. एमबीए केल्यावर नोकरी मिळाली नाही तर पालक थेट मुलांवर जबाबदारी ढकलून मोकळे होतात. देशात आजच्या घडीला प्रशिक्षित एमबीएची उणीव आहे. शिवाय, हे शिक्षण महागडे होत चालले आहे. त्यामुळे, कोणताही निर्णय घेताना किमान पाच वेळा स्वत:ला प्रश्न विचारा. त्यातून तुमच्या विचारात स्पष्टता येत जाईल आणि कोणत्या क्षेत्रात करिअर करायचे हे ठरवणे सोपे जाईल, असे नीरज हुद्दार म्हणाले. अवनी देशमुख व यश देशपांडे यांच्या शंकांचे त्यांनी निरसन केले. कार्यक्रमाचे संचालन डॉ. अमर देशपांडे यांनी केले.
.................