कळंभातील शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या पालकमंत्र्यांकडे भावनानागपूर : राज्यातील दुष्काळग्रस्त भागाला शासनाने रोख मदत करण्यापेक्षा जलसंधारणाची जास्तीत जास्त कामे घेऊन शेतकऱ्यांसाठी पाणी उपलब्ध करून द्यावे व शेतकऱ्यांची जमीन सुजलाम सुफलाम करावी, अशी मागणीवजा स्पष्ट भावना काटोल तालुक्यातील कळंभा या गावातील शेतकऱ्यांनी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे केली. याप्रसंगी आमदार डॉ. आशिष देशमुखही सोबत होते. काटोल तालुक्यातील कळंभा येथे लांडगी नदीवर जलयुक्त शिवार योजनेतून विस्तीर्ण असा बंधारा तयार करण्यात आला आहे. पावसाळयात या बंधाऱ्यातील पाणी अनेक गावांचे जलस्रोत जिवंत ठेवणार आहे. या कामामुळे गावातील शेतकरी समाधानी असून भीषण पाणीटंचाईचा सामना करीत असलेल्या या शेतकऱ्यांना बंधाऱ्यातून आशेचा किरण दिसला आहे. दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना पैसा नको पण जलसंधारणाची अशी कामे करा की पुन्हा गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागणार नाही, अशी प्रतिक्रया या बंधाऱ्याची पाहणी करताना शेतकऱ्यांनी व्यक्त केली. याशिवाय जलयुक्त शिवारअंतर्गत अनेक बंधाऱ्यांची कामे सुरू असून छोट्या बंधाऱ्यांची कामेही जवळजवळ पूर्ण झाली आहे. पाणीटंचाईचा ‘डार्क झोन’ मध्ये गणना होणाऱ्या काटोल-नरखेड या भागाला जलसंधारणांच्या कामांचा चांगला फायदा होणार असल्याचा विश्वास पालकमंत्री बावनकुळे यांनी व्यक्त केला. (प्रतिनिधी)भीषण पाणीटंचाईकळंभा भागात सध्या भीषण पाणीटंचाईची स्थिती आहे. लांडगी नदी पावसाळयात चांगला पाऊस झाला तरच वाहते. जानेवारीपर्यंत या परिसरातील विहिरींना पाणी असते. त्यानंतर या विहिरींमध्ये अजिबात पाणी पाहायला मिळत नाही. अक्षरश: या विहिरी कोरड्या झाल्या आहेत. बंधाऱ्यामुळे व पाऊस चांगला पडल्यावर या विहिरींना बारा महिने पाणी उपलब्ध राहणार आहे. सूर्य ४६ अंशाची आग ओकत असताना या भागातील जलस्रोतांना आता बंधाऱ्याशिवाय जलसंधारणाच्या कामांमुळे दिलासा मिळणार आहे.
रोख मदत देण्यापेक्षा जलसंधारणाची कामे करा
By admin | Published: May 25, 2016 2:50 AM