लोकमत न्यूज नेटवर्क
नागपुर: शहरातील नागरिकांना शुद्ध हवा मिळावी यासाठी महापौरांनी ऑक्सिजन उद्यानाची घोषणा केली. पण देखभाल करण्यासाठी मनुष्यबळ नसल्याने महापालिकेची ९५ उद्याने रामभरोसे आहेत.
उद्यानाचा विकास आणि देखभाल दुरुस्तीची जबाबदारी ही उद्यान विभागाची आहे. मात्र ३१ उद्यानात पाण्याची सोय नाही तर कुठे सुरक्षा रक्षक नाही. ४७ ठिकाणी शौचालयाची सुविधा नाही. विभागात २७३ पदे मंजूर असताना कार्यरत कर्मचारी केवळ ६५ आहेत. कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त भार सोपविण्यात आला आहे. उद्यान विभागाची स्थिती दयनीय आहे. महापालिका आता ऑक्सिजन उद्यान निर्माण करणार असल्याचा दावा केला जात आहे. मात्र आहेत त्या उद्यानाच्या देखभाल दुरुस्तीवरून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. ओसाड होत असलेल्या उद्यानाच्या तक्रारी केल्या जातात. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत नगरसेवक अधिकाऱ्यांना जाब विचारतात. कामे केली नाहीत म्हणून त्यांना अनेकदा वेठीस धरण्यात येते. परंतु, विभागाची दुसरी बाजू कोणीही बघत नाही. ९५ उद्यानावर ६५ कर्मचारी देखरेख ठेवणार कशी? रिक्त पदे भरली कधी जाणार असा प्रश्न महासभेत कोणीही उपस्थित करत नाही. उद्यान विभागाची एकूण आस्थापना ही २७३ कर्मचाऱ्यांची आहे. आकृतिबंधात ही सर्वपदे मंजूर आहेत. परंतु, १२१ कर्मचाऱ्यांची प्रत्यक्षात विभागात नियुक्ती करण्यात आली. अर्थात, १५२ पदे रिक्त आहेत. १२१ कर्मचाºयांपैकी तब्बल ५७ कर्मचारी हे पालिकेच्या इतर विभागात कामाकरिता पाठविण्यात आले आहेत. म्हणजेच केवळ ६५ कर्मचाऱ्यांच्या खांद्यावर उद्यानांचा भार आहे.
०००बॉक्स०००
वृक्ष निरीक्षक नाहीत
शहरातील वृक्ष गणनेची कामे केली जातात. कामावर देखरेख ठेवण्याकरिता लागणारे वृक्ष निरीक्षक महापालिकेत नाही. अशातच, वृक्षगणना योग्य कशी होणार? नवीन आराखड्यात वृक्ष निरीक्षक आणि सहायक वृक्ष निरीक्षकांची पदे मंजुरीकरिता राज्य सरकारकडेे पाठविण्यात आली. परंतु अद्याप ती मिळालेली नाही.
....
उद्यान विभागात मंजूर पदे -२७३
रिक्त पदे - १५२
दुसऱ्या विभागात कार्यरत ५७
उद्यान विभागात कार्यरत ६५
...