लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भारतातील सर्वात जुन्या पाच कृषी महाविद्यालयात नागपूर कृषी महाविद्यालयाचा समावेश आहे. गौरवशाली इतिहास असलेल्या या महाविद्यालयाची स्थापना १९०६ साली ब्रिटिश काळात झाली. या महाविद्यालयाकडून शेतकऱ्यांना मोठी आशा आहे. मागील काही वर्षांतील वातावणातील बदल, बेभरवशाचा मान्सून यामुळे शेतीचे गणित बिघडले आहे. निसर्गाच्या असमतोलामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते. कोरवडवाहू शेती बेभरवशाची झाली आहे. सिंचनाची सुविधा असली तरी उत्पन्नाची शाश्वती नाही. अशापरिस्थितीत संरक्षित शेती प्रकल्प, शेडनेट शेती वरदान ठरू शकते. मात्र शेतकऱ्यांपुढे आदर्श निर्माण करण्याची अपेक्षा असलेल्या कृषी महाविद्यालयाने उभारलेला डोम वर्षानुवर्षे फुलबाग फुलेल या प्रतीक्षेत फाटला, पण बाग फुलली नाही. या प्रकल्पावर केलेला लाखो रुपयांचा खर्च पाण्यात गेला आहे.
शेडनेट शेती प्रकल्पासाठी कृषी महाविद्यालयाने आठ वर्षांपूर्वी आठ डोम उभारले होते. यावर ७२ लाखांचा खर्च करण्यात आला. यात जातीवंत फुलबाग, विविध प्रकारची फळझाडे, नर्सरी निर्माण होतील. शेतकऱ्यांना यातून प्रेरणा मिळेल, अशी आशा होती. परंतु असे काहीही घडले नाही. मागील आठ वर्षांपासून डोम वापराविना पडून होते. यात कुठल्याही प्रकारची नर्सरी वा फळझाडे निर्माण करण्यात आली नाही.
....
विद्यार्थ्यांना शिक्षण कसे मिळणार?
शेतकरी कुटुंबातील सदस्य वाढल्याने आज शेतीवर भार वाढला आहे. अशापरिस्थितीत कमी जागेत अधिक उत्पादन मिळण्यासाठी शेडनेट शेती प्रकल्प, पॉलिहाऊसच्या माध्यमातून शेती करणे गरजेचे झाले आहे. कृषी महाविद्यालयाची ही जबाबदारी आहे. याच हेतूने महाराज बागेजवळील कृषी महाविद्यालयाच्या जागेत शेडनेट उभारण्यात आले होते. परंतु आधुनिक पद्धतीने शेती करण्याच्या प्रयोगाकडे दुर्लक्ष केले. अशापरिस्थितीत विद्यार्थ्यांना शिक्षण कसे मिळणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
...
जरबेरा, गुलाब फुललाच नाही
आठ शेडनेटमध्ये जरबेरा, गुलाब अशा बाजारात मागणी असलेल्या फुलांच्या नवीन जाती, सोबतच ढोबळ मिरची, भाजीपाला, सुधारित फळझाडांची लागवड केली जाणार होती. मात्र महाविद्यालयाने याबाबत उत्सुकता दर्शविली नाही. यामुळे कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शासनाने यासंदर्भात दखल घेण्याची गरज आहे.