चक्रधर गभणे
लाेकमत न्यूज नेटवर्क
रेवराल : माैदा तालुक्यातील सात ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचे निकाल साेमवारी (दि. १८) जाहीर करण्यात आले. यात चार ग्रामपंचायतींवर बहुमत मिळवित काॅंग्रेस समर्थित महाविकास आघाडीने तालुक्यात वर्चस्व प्रस्थापित केले असून, भाजप समर्थित गटाला तीन ग्रामपंचायतींवर बहुमत मिळाले आहे.
माैदा हा भाजपचे आ. टेकचंद सावरकर यांचा गृह तालुका असल्याने या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये भाजप समर्थित गटाला चांगले यश मिळेल अशी आशा व्यक्त केली जात हाेती. मात्र, मतदारांनी काॅंग्रेस समर्थित गटाला साथ दिली. तालुक्यातील मोरगाव, मोहाडी, धर्मापुरी व दुधाळा या चार ग्रामपंचायतींवर काॅंग्रेस समर्थित महाविकास आघाडीने तर सिरसोली, पानमारा व नरसाळा या तीन ग्रामपंचायतींवर भाजप समर्थित गटाने बहुमत मिळविले आहे.
मोरगाव येथे नऊपैकी पाच उमेदवार महाविकास आघाडीचे तर चार उमेदवार भाजप समर्थित गटाचे निवडून आले आहेत. सिरसोली येथे भाजप समर्थित गटाचे पाच तर महाविकास आघाडीचा एक उमेदवार निवडून आला असून, तीन उमेदवारांची अविराेध निवड करण्यात आली. माेहाडी येथे महाविकास आघाडी समर्थित गटाचे पाच तर भाजप समर्थित गटाचे तीन व प्रहार समर्थित गटाचा एक उमेदवार निवडून आला आहे.
धर्मापुरी येथे महाविकास आघाडी समर्थित गटाचे सहा सदस्य निवडून आले असून, यात एक उमेदवार अविराेध निवडून आला आहे. येथे भाजप समर्थित गटाला तीन जागा मिळाल्या आहेत. दुधाळा येथे सर्वच अर्थात नऊही जागा महाविकास आघाडी समर्थित गटाने जिंकल्या असून, येथे भाजप समर्थित गटाला खातेही उघडणे शक्य झाले नाही. पानमारा येथे नऊपैकी भाजप समर्थित गटाला पाच तर महाविकास आघाडी समर्थित गटाला चार जागा मिळाल्या आहेत. नरसाळा येथे भाजप समर्थित गटाने सहा तर महाविकास आघाडी समर्थित गटाने तीन जागा जिंकल्या आहेत.
...
अविराेध निवड
माैदा तालुक्यातील सिरसाेली ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या वायगाव येथील एका वाॅर्डमधील तिन्ही उमेदवारांची अविराेध निवड करण्यात आली असून, धर्मापुरी येथील एक उमेदवार अविराेध निवडून आला आहे. वायगाव येथील तिन्ही उमेदवार भाजप समर्थित गटाचे असून, धर्मापुरी येथील उमेदवार शिवसेना समर्थित गटाचा आहे. यावर्षी विजयी मिरवणूक काढण्यात पाेलीस प्रशासनाने मज्जाव केला हाेता.