डॉन अरुण गवळीला मिळाली संचित रजा, २८ दिवस कारागृहाबाहेर राहणार
By राकेश पांडुरंग घानोडे | Published: September 26, 2023 05:49 PM2023-09-26T17:49:22+5:302023-09-26T17:50:21+5:30
हायकोर्टाचा निर्णय : यापूर्वी रजेवर सुटल्यानंतर कायदे व नियमांचे काटेकोर पालन केले
नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्यानागपूर खंडपीठाने मंगळवारी मुंबईतील कुख्यात डॉन अरुण गवळीला २८ दिवसाची संचित रजा (फरलो) मंजूर केली. न्यायमूर्तिद्वय नितीन सांबरे व वाल्मिकी मेनेझेस यांनी हा निर्णय दिला.
गवळीने संचित रजेसाठी सुरुवातीला कारागृह उपमहानिरीक्षकांकडे अर्ज सादर केला होता. परंतु, गवळी गुन्हेगारांच्या टोळीचा म्होरक्या असल्याचे व त्याला रजेवर सोडल्यास कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याचे कारण नमूद करून तो अर्ज नामंजूर करण्यात आला होता. त्यामुळे गवळीने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. कारागृह उपमहानिरीक्षकांचा निर्णय अवैध असल्याचे त्याचे म्हणणे होते. यापूर्वी रजेवर सुटल्यानंतर कायदे व नियमांचे काटेकोर पालन केले. परिणामी, यावेळीही रजा नाकारता येणार नाही, असे देखील त्याने सांगितले.
न्यायालयाने यासह विविध बाबी लक्षात घेता त्याची याचिका मंजूर केली. गवळीला शिवसेनेचे नगरसेवक कमलाकर जामसंडेकर यांच्या खून प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा झाली आहे. तो नागपूर मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत आहे. गवळीतर्फे ॲड. मीर नगमान अली यांनी बाजू मांडली