डॉन अरुण गवळीला संचित रजाही मंजूर, उच्च न्यायालयाचा निर्णय
By राकेश पांडुरंग घानोडे | Published: December 15, 2022 03:54 PM2022-12-15T15:54:07+5:302022-12-15T15:57:46+5:30
अटींसह सोडले जाणार
नागपूर : काही दिवसांपूर्वी मुलाच्या लग्नानिमित्त मिळालेल्या अभिवचन रजा (पॅरोल) उपभोगून आलेला मुंबईतील कुख्यात डॉन अरुण गवळी याला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने आता संचित रजा (फरलो) देखील मंजूर केल्या.
न्यायमूर्तीद्वय सुनील शुक्रे व महेंद्र चांदवाणी यांनी गवळीला हा दिलासा दिला. गवळीला त्याच्या पात्रतेनुसार व आवश्यक अटींसह संचित रजा देण्यात याव्या आणि त्याला या निर्णयाची प्रत मिळाल्यापासून एक आठवड्यात सोडण्यात यावे, असे न्यायालयाने सांगितले. रजा मंजूर केल्यास गवळी मुंबई महानगरपालिका निवडणूक प्रभावित करू शकतो, या कारणावरून कारागृह विभागाचे उपनिरीक्षक (पूर्व) यांनी गवळीचा संचित रजेचा अर्ज नामंजूर केला होता. त्यामुळे त्याने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.
न्यायालयाने ठोस पुरावे रेकॉर्डवर नसल्यामुळे संबंधित कारण काल्पनिक असल्याचे मत व्यक्त केले. गवळीला यापूर्वीही अनेकदा अभिवचन व संचित रजेवर सोडण्यात आले. दरम्यान, त्याने नियमांचे काटेकोर पालन केले. त्याने एकदाही अवैध कृती केली नाही, असे न्यायालयाने रजा मंजूर करताना स्पष्ट केले. गवळीला शिवसेनेचे नगरसेवक कमलाकर जामसांदेकर यांच्या खून प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा झाली आहे. तो नागपूर मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत आहे. गवळीतर्फे ॲड. मीर नगमान अली यांनी कामकाज पाहिले.