नागपूर : नवी मुंबईतील तळोजा कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला मुंबईचा डॉन अरुण गवळी याला सोमवारी सकाळी ९ वाजता कडेकोट पोलीस बंदोबस्तात नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात आणण्यात आले आहे. त्यामुळे या कारागृहाची सुरक्षा व्यवस्था आणखी वाढविण्यात आली आहे. नगरसेवक कमलाकर जामसांडेकर यांच्या हत्येप्रकरणी गवळीसह ११ जणांना मोक्का विशेष न्यायालयाने २४ आॅगस्ट २०१२ रोजी जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. हत्येची ही घटना २ मार्च २००७ रोजी घडली होती. जन्मठेप झाल्यापासून गवळीला तळोजा कारागृहात ठेवण्यात आले आहे. खून, खंडणी वसुली, दंगल घडविणे, अशी अनेक प्रकरणे त्याच्याविरुद्ध आहेत. गवळी हा तळोजा कारागृहात असताना त्याची प्रकृती बिघडल्याने त्याला डिसेंबर २०१४ मध्ये मुंबईच्या जे.जे. इस्पितळात दाखल करण्यात आले होते. अरुण गवळीच्या जीवनावर ‘डॅडी’ नावाचा चित्रपट बनत आहे. या चित्रपटात डॅडीची भूमिका वठविणारा अभिनेता अर्जुन रामपाल याने इस्पितळात गवळीची भेट घेऊन चर्चा केली होती. या भेटीने वादळ उठले होते. या कारणामुळे आणि सुरक्षेच्या कारणामुळे गवळीला नागपूर कारागृहात ठेवण्यात आले आहे.
डॉन नागपूर कारागृहात
By admin | Published: March 17, 2015 1:42 AM