नागपूर : शहरातील भटक्या कुत्र्यांच्या हैदोसामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. भटक्या कुत्र्यांनी नागरिकांना शारीरिक इजा पोहोचविल्याच्या घटना रोज घडत आहेत. परिणामी, भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करणे आवश्यक झाले आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी ही बाब लक्षात घेता भटक्या कुत्र्यांना कोणीही रस्ता, उद्याने यांसह कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी खाऊ घालू नये, असा आदेश दिला.
रोज विनापरिश्रम खायला मिळत असल्यामुळे भटके कुत्रे विशिष्ट ठिकाणी टोळी करून राहतात. ते जाणाऱ्या-येणाऱ्या नागरिकांवर धावून जातात. अनेकदा नागरिकांना चावतात. परिसरात घाण करून ठेवतात. त्यामुळे त्यांना आयते खायला देणे बंद करणे आवश्यक आहे. ज्यांना भटक्या कुत्र्यांना खाऊ घालायचे आहे, त्यांनी या कुत्र्यांना स्वत:च्या घरी घेऊन जावे. त्याकरिता महानगरपालिकेकडून रीतसर परवाना प्राप्त करावा. त्यानंतर भटक्या कुत्र्यांना वाटते तेवढे खाऊ घालावे. त्यांच्यावर प्रेमाचा वर्षाव करावा, असेही न्यायालयाने हा आदेश देताना सांगितले.
शहरातील भटक्या कुत्र्यांचा हैदोस थांबविण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्यात याव्यात, भटक्या कुत्र्यांनी जखमी केलेल्या नागरिकांना भरपाई देण्यात यावी, इत्यादी मागण्यांसह व्यावसायिक विजय तालेवार व मनोज शाक्य यांनी याचिका दाखल केली आहे.